Pune News : वीज कंत्राटी कामगारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्या; महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

एमपीसी न्यूज – वीज कंत्राटी कामगारांना सुद्धा फ्रंट लाइन वर्करचा दर्जा द्या, अशी मागणी वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने कायम कामगारांच्या कृती समितीला पाठिंबा जाहीर केला असून कंत्राटी कामगार संघाचे सुमारे 12 हजारपेक्षा जास्त सदस्य या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, महावितरण, महापारेषण महानिर्मिती या वीज कंपनीतील कायम कामगार, वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृती समिती 24 मे पासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत.

वीज कंत्राटी कामगारांना सुद्धा फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा व शासन लाभ मिळावेत अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली आहे. तसेच कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे. कोरोनाबाधित कंत्राटी कामगाराला 30 ऐवजी 50 लाखाचे सानुग्रह अनुदान मिळावे आणि कोरोनाचा उद्रेक पाहता काळात वीजबिल वसुली सक्ती करू नये, अशा मागण्या संघाने केल्या आहेत.

याबाबतचे निवेदन वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन पाठवले आहे. वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.