Pune News : भामा आसखेड योजनेतून वाघोलीला पाणी द्या ; शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांची मागणी

एमपीसी न्यूज : भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतून शहराच्या पूर्व भागात असलेल्या आणि नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या वाघोलीमध्ये पाणी द्या, अशी मागणी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याप्रसंगी राज्याचे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

सध्या वाघोली गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. परंतु वाघोली गावाचा समावेश पुणे महापालिकामध्ये होत असल्याने नव्याने होत असलेला भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेचा लाभ वाघोलीकरांना मिळणे गरजेचे आहे. भामा आसखेड योजनेचे पाणी वाघोलीपर्यंत आणण्याकरिता अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचा उपयोग करता येईल.

सदरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेतून वाघोली गावाकरिता पाणीपुरवठा होत होता. परंतु ही योजना काही कारणास्तव बंद आहे. पूर्व भागासाठी भामा आसखेड योजनेचे पाणी मिळावे यासाठी संबधित विभागास योग्य ते आदेश करून वाघोलीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार पवार यांनी केली आहे.

वाघोली गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करून वाघोलीचा पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश करून घेतला आहे. वाघोलीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उत्तम दर्जाच्या मिळाव्यात व वाघोली हे पुण्यानजीकचे एक सर्वोकृष्ट उपनगर बनावे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.