Pune News : खुशखबर…अभय योजनेतून 477 कोटी 20 लाखांचा पालिकेच्या तिजोरीत भरणा !

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या पुणे महापालिकेला अभय योजनेमुळे संजीवनी मिळाली आहे. महापालिकेने मिळकत थकबाकीदारांसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेला पुणेकरांनी प्रतिसाद दिला आहे. 1 ऑक्टोबर ते 26 जानेवारीपर्यंत जाहीर केलेल्या अभय योजनेतून तब्बल 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकीची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे.

पुणे महापालिकेला दरवर्षी मिळकतकरातून 1200 ते 1300 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. यंदाच्यावर्षी 25 जानेवारीपर्यंत 1 हजार 280 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने 1 ऑक्टोबर ते 26 जानेवारीपर्यंत जाहीर केलेल्या मिळकतकरावर आकारलेल्या दंडावरील सवलत देण्याच्या अभय योजनेमुळे ही उत्पन्न वाढ झाली आहे. स्थायी समितीने 1 ऑक्टोबर पासून 30 नोव्हेंबरपर्यंत अभय योजना लागू करताना दंडाच्या रकमेत 80 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत तब्बल 1 लाख 14 हजार 631 थकबाकीदारांनी 351 कोटी 18 लाख रुपये मिळकतकर जमा केला.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर या योजनेला 10 डिसेंबरपासून मुदतवाढ देताना 10 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत थकबाकी भरणार्‍यांना दंडाच्या रकमेत 75 टक्के सवलत देण्यात आली होती. त्यानंतर 26 जानेवारीपर्यंत थकबाकी भरणार्‍यांना दंडाच्या रकमेत 70 टक्के सवलत देण्यात आली होती. या कालावधीत 34 हजार 179 थकबाकीदारांनी 126 कोटी 1 लाख रुपये थकबाकी भरली आहे.

या संदर्भात माहिती देताना स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, कोरोनासारख्या कालावधीत पुणेकर नागरिकांनी महापालिकेवर विश्‍वास दाखवत मोठ्याप्रमाणावर थकबाकी भरली आहे. मिळकतकर उत्पन्नाच्या बाबतीत पुणे महापालिका आघाडीवर राहिली आहे. नियमीत कर भरणार्‍या मिळकतकर धारकांसोबतच 1 लाख 48 हजार 810 जणांनी 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी भरली आहे.

पुढील वर्षापासून या थकबाकीदारांनी नियमीतपणे वेळेत कर भरल्यास महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. कोरोनामुळे तब्बल 9 महिने शहरातील विकासकामे जवळपास ठप्प झाली होती. परंतू मिळकतकर विभागाने चांगली कामगिरी केल्याने या आर्थिक वर्षात पालिकेचे वार्षिक उत्पन्न 4500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे विकासकामांनाही गती देण्यास मदत होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.