Pune News: सनीज वर्ल्ड रिसॉर्टमध्ये शासनाने जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करावे – विनायक निम्हण

18 हजार स्क्वेअर फुटचे दोन प्रशस्त हॉल, अनेक रूम्स, कॉटेजेसची सुविधा

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे महापालिका, राज्य शासन व खासगी हॉस्पिटल्स प्रयत्न करूनही कोरोना विषाणूची दुसरी लाट आटोक्यात येताना दिसत नाही. अनेकांना कोरोनाची प्राथमिक लागण झाल्यानंतर त्यांना छोट्या घरामुळे स्वतंत्र होम आयसोलेशन करता येत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार या घरांमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सूस रोड येथील सनीज वर्ल्ड रिसॉर्ट येथे शासनाने जम्बो कोविड सेंटर सूरु करावे, अशी सूचना रिसॉर्टचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक निम्हण यांनी जिल्हा प्रशासनाला केली.

याठिकाणी पंचतारांकित सुविधा आहेत. येथील रुग्णांना चहा, नाष्टा, जेवण मोफत देण्याची व्यवस्था आम्ही करतो. सामाजिक भावनेतून रिसॉर्ट आम्ही कोविडसाठी वापरण्याकरिता देण्यास तयार असल्याचे निम्हण यांनी सांगितले.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदनात देण्यात आले आहे. त्यात माजी आमदार विनायक निम्हण यांनी म्हटले आहे की, पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. बेडची कमतरता जाणवत आहे. पुणे शहर दाटीवाटीचा भाग आहे. छोटी घरे आहेत. कोरोना पॉझिटिव्ह पण लक्षणे नाहीत अशा अनेक रुग्णांना होम आयसोलेशन करता येत नाही. त्यांच्यामुळे घरातील सर्वांना कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यास बेड अडखून राहतात. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सूस रोड येथील सनीज् वर्ल्ड रिसॉर्ट येथे कोरोना रुग्णांसाठी जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्याची आमची इच्छा आहे. सनीज वर्ल्ड मध्ये 18 हजार स्क्वेअर फुटचे दोन प्रशस्त हॉल, अनेक रूम्स / कॉटेजेस आहेत.

पाणी, वीज, पंखे, संडास, बाथरूम, एसी रूम अशा सुविधा आहेत. तसेच परिसर अतिशय हवेशीर आहे. या ठिकाणी शासनाचे कोरोना रुग्णांसाठीचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यास आम्ही उत्सुक आहोत. येथे दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांना रोज चहा, नाश्ता व दोन वेळचे जेवण मोफत देण्याची व्यवस्था आम्ही करू इच्छितो. या नियोजित जम्बो कोविड केअर सेंटरसाठी आपण प्रत्यक्ष पाहणी करून मान्यता द्यावी.

हे जम्बो कोविड केअर सेंटर येथे तातडीने सुरू करावे. या सेंटर मध्ये शासनाने आवश्यक ते डॉक्टर्स व नर्सेस हा स्टाफ व वैद्यकीय सेवा द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे. झाडलोट साफसफाई व अन्य अनुषंगिक कामांसाठी आमच्याकडे स्टाफ आहे. या जम्बो सेंटर मध्ये शासन ज्या करोना रुग्णांना पाठवेल त्यांची चोख व्यवस्था आमच्या रिसॉर्टतर्फे केली जाईल. या प्रस्तावाचा विचार करावा आणि सनीज वर्ल्ड येथे आमच्या जागेत प्रत्यक्ष पाहणी करण्यास अधिकारी पाठवावेत. तेथे हे केंद्र सुरू करावे विनंती माजी आमदार निम्हण यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.