Pune News : महाआघाडी सरकारला मराठा आरक्षण टिकवण्याची इच्छाच नव्हती : चंद्रकांत पाटील

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या संदर्भात सत्ताधारी पक्षाने केलेले वर्तन शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला शोभणारे नाही, असेही पाटील यांनी नमूद केले.

एमपीसी न्यूज – महाआघाडी सरकारला मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे, अशी इच्छाच नव्हती. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.

मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पाटील बोलत होते. अभिनेत्री कंगना राणावत हिच्या संदर्भात सत्ताधारी पक्षाने केलेले वर्तन शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला शोभणारे नाही, असेही पाटील यांनी नमूद केले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अथक परिश्रम घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले. काँग्रेस – राष्ट्रवादीचे आघाडी सरकार 15 वर्षे सत्तेत असूनही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नव्हते.

मात्र, आमच्या सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे, अशी महाआघाडी सरकारची इच्छाच नव्हती, असे दिसते आहे.

महाराष्ट्रात आरक्षणाच्या 50  टक्के मर्यादेचे उल्लंघन झाले. मात्र, अनेक राज्यात आरक्षणाची ही मर्यादा ओलांडली गेली आहे. त्याबद्दलचे खटले सर्वोच्च न्यायालयात सुरु आहेत.

पण, कोणत्याही राज्याच्या मर्यादेपलीकडील आरक्षणाला न्यायालयीन स्थगिती मिळालेली नाही. फक्त महाराष्ट्राबाबतीच असे का घडले ?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे आम्ही महाआघाडी सरकारला सांगत होतो. महाराष्ट्र सरकारकडून आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी चांगल्या वकिलांची फौज उभी करा, असे मी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना सांगितले होते.

मात्र, आमच्या सल्ल्याकडे या सरकारने गांभीर्याने पाहिले नाही. त्याचा परिणाम सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीतून दिसून आला, असेही पाटील यांनी सांगितले.

अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबाबत काही तक्रारी, आक्षेप असतील तर तिच्याविरुद्ध न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. मात्र, असे न करता तिच्यामागे सत्ताधारी मंडळी एखाद्या लांडग्यासारगे लागली आहेत, असेही त्यांनी सुनावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.