Pune News : खगोल विज्ञानात मोठ्या संधी – शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे

'दररोज एक प्रश्न खगोलशास्त्रा'चा या उपक्रमाचा सलग एक हजार दिवसांचा प्रवास

एमपीसी न्यूज – खगोल विज्ञानातील अद्याप न सुटलेली कोडी सोडवण्यासाठी ‘मिशन आदित्य’ ही भारताची मोहीम यशस्वी ठरणार आहे. त्यातून मोठी माहिती उपलब्ध होणार असून, त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे मत शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स अण्ड ट्रेनिंग इनस्टिट्यूट’च्या (जेआरव्हीजीटीआय) वतीने टिळक रस्तावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील तारांगणामध्ये गेली आठ वर्षे आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्राचे अभ्सास वर्ग घेतले जातात. या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘दररोज एक प्रश्न खगोलशास्त्रा’चा या उपक्रमाचा सलग एक हजार दिवसांचा प्रवास पूर्ण झाला. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. रानडे बोलत होते. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जेआरव्हीजीटीआयचे संचालक प्रशांत गोखले, तारांगणाचे विभाग प्रमुख विनायक रामदासी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पार्श्वभूमी –
तारांगणात खगोलशास्त्राचे वर्ग घेण्यात येतात. दर महिन्याला साधारणपणे दोन व्याख्याने, निरीक्षण आणि कृती असा अभ्यासक्रम असतो. विद्यार्थ्यांशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी 1 ऑक्टोबर 2018 पासून दररोज विभाग प्रमुख विनायक रामदासी संध्याकाळी सात वाजता व्हाटसअपच्या ग्रुपवर एक वस्तुनिष्ठ प्रश्न पाठवितात. विद्यार्थी त्याची उत्तरे रामदासींच्या वैयक्तिक मोबाईलवर पाठवतात. या उपक्रमाला एक हजार दिवस पूर्ण झाले.

रामदासी म्हणाले, ‘ही प्रेरणा शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या मुलाखतीतून घेतली. त्यांचे मामा दररोज एक गणित फळ्यावर लिहून ठेवत असत आणि नारळीकर ते सोडवत असत. ही आठवण नारळीकर सरांनी ऑगस्ट 2018 च्या साहित्य परिषदेतील एका कार्यक्रमात बोलताना सांगितली होती. त्याचे आम्ही अनुकरण केले. या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर डॉ. नारळीकरांची भेट घेऊन त्यांना उपक्रमाबद्दल सांगितले. सरांनी विद्यार्थ्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. 14 नोव्हेंबर 2019 रोजी आयुकाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.