Pune News : भाजपचे महावितरणच्या कार्यालयासमोर ‘हात पंखे वाटप’ आंदोलन

एमपीसी न्यूज –  कोळसा टंचाईचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर विजेची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आता भारनियमनाऐवजी देखभाल दुरुस्तीचे कारण देत वीज वितरणच बंद ठेवून जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.

 

विजेचे अघोषित भारनियमन, वाढीव अनामत रक्कम, ग्रामीण भागातील भारनियमन या संदर्भात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आज शहर भाजपच्यावतीने महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी नागरिकांना हात पंखे वाटप केले.

 

या वेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, धनंजय जाधव, प्रमोद कोंढरे, प्रशांत हरसुले, चंद्रकांत पोटे, महेश पुंडे, आरती कोंढरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

मुळीक म्हणाले, अघोषित भारनियमनामुळे राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबर विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, कर्मचारी यांचे जीवन मेटाकुटीस आले आहे. त्यातच वाढीव अनामत रक्कम आकारली जात आहे. भाजपचा वाढीव अनामत रक्कम आकारण्यास तीव्र विरोध आहे. तातडीने विजेचे अघोषित भारनियमन थांबवावे, वीजेच्या अनामत रकमेची वाढीव मागणी रद्द करावी, अशी आमची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.