Pune News : बाणेर रस्त्यावर मेट्रोचे खोदकाम सुरू असताना हॅन्ड ग्रेनेड सापडल्याने खळबळ

एमपीसी न्यूज – मेट्रोचे खोदकाम सुरू असताना बाणेर रस्त्यावर हॅण्डग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.

याची माहिती मिळाल्यानंतर चतुःशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या हॅन्ड ग्रेनेडची पाहणी केली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.

पुणे शहरात सध्या अनेक ठिकाणी मेट्रोसाठी खोदकाम सुरू आहे. असेच काम सुरू असताना या पूर्वी स्वारगेट परिसरात एक जुने भुयार आढळले होते तर एका महाकाय प्राण्याची हाडेसुद्धा खोदकामादरम्यान सापडली होती. त्यानंतर आज बाणेर रस्त्यावरील आयशर कंपनी समोर खोदकाम सुरू असताना कर्मचाऱ्यांना बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली.

त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता हे जुने हॅण्डग्रेनेड असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाला घटनास्थळावर तैनात करण्यात आले. सध्या या बॉम्ब सदृश वस्तूची तपासणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.