Pune News : ‘उस्मानाबादमधील चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या’

संभाजी ब्रिगेडचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन

एमपीसीन्यूज : सध्या देशभर स्त्री शक्तीचा जागर, आदर करणारा उत्सव म्हणून नवरात्र उत्सव साजरा होत आहे. परंतु,  पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना उस्मानाबाद मधील लोहारा तालुक्यात सास्तूर या गावात 18 ऑक्टोबर रोजी घडली. या गावात एका नऊ वर्षांच्या चिमुरडीवर चार नराधमांनी अमानुष बलात्कार केल्याचं निदर्शनास आले आहे. पीडित चिमुरडीची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या अनेक घटना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे मुलींना आज घराबाहेर पडणे सुद्धा कठीण झालेलं आहे. कारण यावर प्रशासन आणि न्यायव्यवस्था कुठं तरी कमी पडताना दिसून येत आहे.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात कोपर्डी प्रकरण घडले. याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभर उमटले आणि याचा परिणाम म्हणून ही केस फार्स्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा देखील सुनावली आहे. असे असताना देखील सदर प्रकरणातील आरोपींना अद्यापपर्यंत शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही.

अशा गुन्ह्यातील अनेक कुटुंब न्याय मागताना देशभर दिसून येत आहेत. परंतु, त्यांना लवकर न्याय मिळताना दिसून येत नाही. बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. त्या शिवाय अशा घटनांना कायद्याचा जरब बसणार नाही. शिक्षा होऊन देखील शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ होत नाही म्हणून असे नराधम कायमच कायदा हातात घेऊन हे नीच कृत्य करत राहतील.

म्हणून सरकार, प्रशासन, आणि न्यायपालिका यांनी उस्मानाबाद येथील चिमुरडीवर झालेल्या अमानुष बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे आणि कार्याध्यक्ष गणेश दहिभाते यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.