Pune News: कुणीतरी मारायला येत असल्याचा भास त्याला व्हायचा, शेवटी ‘असा’ झाला त्याचा मृत्यू!

तो धावत एका बंगल्यात घुसला, "मला वाचवा, मला मारण्यासाठी इनोव्हातून लोक आले आहेत, असे म्हणत तो किचनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी चोर समजून घरातील लोकांनी त्याला खिडकीतून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो खाली पडला, गंभीर जखमी झाला आणि या सगळ्या प्रकारातच त्याचा जीव गेला. 

एमपीसी न्यूज – कोणीतरी मारण्यासाठी येत असल्याचा भास एका व्यक्तीला होत होता, त्याच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. हाताला काम मिळावे म्हणून तो पुण्यात आला. इथेही पुन्हा तोच प्रकार, 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पावणे एक वाजता तो धावत एका बंगल्यात घुसला, “मला वाचवा, मला मारण्यासाठी इनोव्हातून लोक आले आहेत, असे म्हणत तो किचनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी चोर समजून घरातील लोकांनी त्याला खिडकीतून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो खाली पडला, गंभीर जखमी झाला आणि या सगळ्या प्रकारातच त्याचा जीव गेला. 

रामकिशन देविदास सुरवसे (वय 26, रा. हलकी, ता. शिरुर, अनंतपाळ, लातूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकिशन सुरवसे हा तरुण गावी असताना त्यास कोणीतरी मारायला आल्याचा भास होत होता. त्यामुळे त्याच्यावर लातूरच्या प्रेरणा रुग्णालयात उपचार सुरू होते. 18 ऑगस्ट रोजी तो हाताला काम मिळेल म्हणून पुण्यात आला होता. तो त्याच्या नातेवाईकांकडे राहात होता. 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास रामकिशनला पुन्हा तोच भास होऊ लागला.

त्यामुळे घाबरून तो वडगाव शेरी येथील बॉम्बे सॅपर्स कॉलनी येथील एका बंगल्याच्या आवारामध्ये घुसला. त्यावेळी तो ‘वाचवा, वाचवा मला मारण्यासाठी इनोव्हा गाडीतून लोक आले आहेत. असे ओरडत तो बंगल्याच्या व्हरांड्यात आला.

घाबरलेल्या अवस्थेतच त्याने व्हरांड्यातील सोफ्यावर चढून देखाव्यासाठी भिंतीला टांगलेले पितळी बिगुल घेऊन त्याने बंगल्याच्या किचनची काच फोडली. त्यानंतर तो घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला.

संबंधित बंगल्यातील कुटुंबही जागे झाले आणि मध्यरात्रीच्या सुमारास चोर किचनवाटे घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे संबंधीत कुटुंबाला वाटले. तो तेथून निघून जावा, उद्देशाने घरातील लोकांनी भरीव लाकडी बांबूच्या सहाय्याने त्याला किचनच्या खिडकीतुन बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी त्यास बांबूचा मार बसल्याने, त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी गंभीर जखमा होऊन त्याचा मृत्यू झाला. या सगळ्या प्रकरणाचा चंदननगर पोलिसांकडून काही दिवसांपासून तपास सुरू होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर याप्रकरणी संबंधीत व्यक्तीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.