Pune News : सिंहगड रोड येथे महिलांसाठी तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – बदलती जीवनशैली आणि रोजच्या कामाच्या व्यापामुळे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) याचे प्रमाण वाढत आहे. याबाबत अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी आरोग्य तपासणी सारखे उपक्रम मोठ्या संख्येने राबविण्याची गरज आहे, असे मत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी व्यक्त केले. 

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिलांसाठी सिंहगड रोड येथे हे तपासणी शिबिर घेण्यात आले. याचे उद्घाटन वाघ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे, सामाजिक कार्यकर्त्या सरोज पांडे, शहर भाजपचे सरचिटणीस दीपक नागपुरे तसेच  इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

भारतात गेल्या काही वर्षांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. या आजाराबद्दल असलेले अज्ञान, आरोग्याविषयी अनास्था आणि उशीरा होणारे निदान, यामुळे हे प्रमाण वाढत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी अशा पद्धतीची तपासणी शिबिरे आयोजित करणे ही काळाची गरज आहे, असे वाघ म्हणाल्या. समाजकार्य करत असताना कामाच्या व्यापात अनेक कार्यकर्त्यांना कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. कुटुंबातील महिलांना देखील आपल्याला होणाऱ्या त्रासाची माहिती योग्य प्रकारे सांगता येत नाही. त्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे कार्यक्रमाचे आयोजक नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी सांगितले. वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास ब्रेस्ट कॅन्सर तसेच गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरवर मात करता येऊ शकते. त्यामुळेच कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिलांसाठी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे नागपुरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.