Pune News : आरोग्यमंत्र्यांनी घेतला ससून व जम्बो कोविड सेंटरचा आढावा

एमपीसी न्यूज – आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज, सोमवारी पुणे येथील सीओईपी येथील कोविड हॉस्पिटला भेट देऊन कमांड रूमची पाहणी करून प्रशासकीय आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन कोरोनाच्या रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेतली.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे व इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ससून रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे, असे सांगून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता भासू नये, यासाठी येथील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

आरोग्यमंत्री टोपे यांनी बाणेर येथे राज्य शासना मार्फत राबवण्यात येणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबदरी कार्यक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या सर्वेक्षण पथकासोबत संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला.

घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, रुग्णाचे निदान लवकर होण्यासाठी जनतेचा सहभाग घेणे, काळजी कशी घ्यावी, सकस आहार घेणे, विश्रांती घेणे, योगा करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.