Pune News : शहरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची हजेरी

एमपीसी न्यूज – राज्यात मागील आठवड्याभरापासून मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. मराठवाड्यात जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळं राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास पावसानं हिरावून घेतला आहे. सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरलं आहे. अशातच राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

आज सोमवारी पुणे शहर आणि परिसरात विजांच्या गडगडासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. दुपारी 4 वाजल्यापासुनच शहरात पावसानं जोरदार सुरूवात केली आहे. त्यामुळं बाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल उडाली आहे. पुण्यातील बावधन, डेक्कन, कोथरूड, वारजे माळवाडी, सिंहगड परिसर आणि शिवाजीनगर या भागात पावसानं हजेरी लावली आहे.

कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेलं शाहीन चक्रीवादळ अधिक तीव्र झाल्यामुळं ओमन देशाच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.

दरम्यान, विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस पडत असल्यानं नागरिकांनी आपली काळजी घ्यावी. जर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पुणे प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. तसेच हवामान खात्याने राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं सांगितलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.