Pune News : बंधुता चळवळीचा इतिहास ग्रंथरूपाने वाचकांच्या भेटीला; डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार प्रकाशन

एमपीसी न्यूज – बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दशकांहून अधिक काळ चालू असलेल्या बंधुता चळवळीचा इतिहास ग्रंथरुपाने वाचकांच्या भेटीला येणार आहे. काषाय प्रकाशनाच्या पुढाकारातून ‘बंधुता आणि संघर्ष’ ग्रंथाचे (दि. 23) रोजी प्रकाशन होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होणार आहे. हॉटेल सुकांता, डेक्कन जिमखाना, पुणे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

काषाय प्रकाशनाच्या या उपक्रमासाठी ‘बंधुता आणि संघर्ष’ या नावे प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत डॉ. नयनचंद्र सरस्वते यांनी अभ्यासात्मक आणि संशोधनात्मक लेखन केले आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची सविस्तर माहितीही यांत आहे. यांमध्ये राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विविध संस्थांच्या सहकार्याने घेतलेल्या सात विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनांची, बारा विविध महापुरुषांच्या जीवनकार्यावर घेतलेल्या विचारवेध संमेलनांची आणि अखंडितपणे घेतलेल्या 22 राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनांची माहिती दिली आहे.

यावेळेस ग्रंथांच्या प्रकाशनाबरोबरच विविध क्षेत्रातील 19 व्यक्तींना आणि सहा संस्थांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार असल्याचे, प्रकाशक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like