Pune News : वाफ घेताना गरम पाणी अंगावर सांडले; दोन कोरोना बाधित चिमुरडे गंभीर जखमी

एमपीसीन्यूज : कोरोनाचा संसर्ग होऊ नये तसेच कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यातून बरे होण्यासाठी वाफ घेण्याचा सल्ला अनेकांकडून दिला जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून वाफ घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. परंतु, वाफ घेताना खबरदारी घेणेही महत्वाचे आहे. कारण वाफ घेत असताना गरम पाणी अंगावर सांडल्याने दोन चिमुरडे गंभीर जखमी झाले आहेत. पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात या घटना घडल्या असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहिल्या घटनेत सहा वर्षाचा चिमुरडा गंभीर भाजला आहे. या चिमूरड्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे घरातच वाफ घेत असताना गरम पाणी या चिमुरड्याच्या अंगावर सांडले. यामध्ये त्याच्या पोटाचा भाग, दोन्ही मांड्या आणि पाय गंभीररीत्या भाजले. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

तर दुसर्‍या घटनेत चार वर्षाची चिमुरडी सुद्धा अशाच रीतीने वाफ घेताना गंभीररित्या भाजली आहे. याच चिमुरडीच्या घरातील आई-वडील, मावशी, आजोबा हे सर्व कोरोना बाधित आहेत.

दरम्यान, दहा दिवसाचा उपचारानंतर या चिमुरडीने कोरोनावर विजय मिळवला आहे. परंतु भाजलेली जखम जाण्यासाठी आणखी काही अवधी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या दोन्ही चिमुरड्यांवर ससून रुग्णालयातील नव्याने बांधण्यात आलेल्या कोविड केअर इमारतीत प्लास्टिक सर्जरी आणि बालरोग विभागाने मिळून उपचार केले. उपचारानंतर त्यांच्या भाजलेल्या जखमा हळूहळू सुधारत गेल्या.

या दोन्ही दुर्घटना वाफ घेताना घडल्या आहेत. त्यामुळे वाफ घेताना आता प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.