Pune News : गृहनिर्माण संस्था पुनर्विकास योजना लवकरच मार्गी लागणार : प्रवीण दरेकर

एमपीसी न्यूज – “मुंबईसह अन्य प्रमुख शहरातील प्रस्तावित गृहनिर्माण संस्था पुनर्विकास योजना लवकरच मार्गी लागणार आहे. या प्रकल्पांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अर्थसहाय्य मिळत होते. मात्र, रिझर्व्ह बँक-‘नाबार्ड’ने निर्बंध घातले होते. त्यामुळे ही महत्वाकांक्षी आणि मध्यमवर्गीयांच्या हिताची योजना रखडली होती. ‘नाबार्ड’च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांना या योजनेची व्याप्ती समजली असून, लवकरच ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचे आश्वासन ‘नाबार्ड’ने दिले आहे,” अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

‘नाबार्ड’चे मुख्य महाव्यवस्थापक एल. एल. रावळ व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, संचालक जिजाबा पवार, युवा मोर्चाचे प्रा. सचिन जायभाये यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रवीण दरेकर म्हणाले, “या योजनेअंतर्गत मुंबईमध्ये चार इमारतीचा पुनर्विकास झाला आहे. आज १६०० पेक्षा अधिक प्रस्ताव आहेत. ठाण्यासह इतर शहरांनी या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, हा विषय रियल इस्टेस्ट समजून नाबार्डने जिल्हा मध्यवर्ती बँकेने अर्थपुरवठा करण्यास निर्बंध घातले होते.

यात कुठेही विकसक किंवा नफेखोरीचा प्रश्न नाही. गृहनिर्माण संस्था त्यांची इमारत स्वतः विकसित करणार होती. ही बाब नीटपणे समजून सांगितल्यानंतर नाबार्डने अर्थसहाय्य करण्याबाबतचे निर्बंध उठवले जातील, असे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला कार्यान्वित करून प्रोत्साहन दिले होते.

…तर कंगनाचीही चौकशी व्हावी

कंगना रानौत ड्रगिस्ट असल्याचे बोलले जात असेल तर तिचीही चौकशी झाली पाहिजे. आपल्या वैभवशाली चित्रपट सृष्टीत नवोदीत कलाकार येणार असतील व त्यांना ड्रग्जचे व्यसन जडणार असल्याची शक्यता असल्यास कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही. ड्रग्जचे व्यसन हे फिल्म इंडस्ट्रीच्या हिताचे नाही. केवळ फिल्म इंडस्ट्री नाही तर आपल्या देशात अशाप्रकारे अंमली पदार्थाचा विळखा होता कामानये, कुणीही असो अशा प्रकारची भूमिका असली पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.

प्रत्येक गोष्टीवरून राजकारण करण्याची आवश्यकता आहे का ? असा सवाल करीत जर ड्रग्ज घेत असतील एनसीबीने चौकशीला बोलावले तर कुणाच्या पोटात का कशासाठी दुखायला पाहिजे? कंगना जर ड्रग्ज घेत असेल, ड्रगिस्ट असेल तर तिचा संबंधित व्हिडिओची सत्यता पडताळून तिची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

कंगना थोडी या देशाची वेगळी नागरिक आहे, सगळ्यांना न्याय तोच कंगनाला न्याय. कायदा हा आपल्या देशात सर्वांना सारखा आहे.” असेही दरेकर म्हणाले.

कोरोना संसर्गात पुणे एक नंबरवर असणे क्लेशदायी

पुणे हे सांस्कृतिक वैभव असलेले शहर आहे. मात्र, आज कोरोना संसर्गात पुणे एक नंबरवर असणे क्लेशदायी आहे. हे सरकार अहंकारी आहे. त्यामुळे उपाययोजना केल्या जात नाहीत. आम्ही केलेल्या सूचनांचे स्वागत होत नाही. औषधांची कमतरता, व्यवस्थेतील त्रुटी दाखवल्या, तर सरकार त्या स्वीकारण्यापेक्षा रेटून नेण्याचे काम सरकार करतेय. नियोजन करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.

मराठा समाजाची दिशाभूल

आर्थिक मागास वर्गात त्यांचा आधीच समावेश होणार होता. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याने त्यांना आर्थिक मागास वर्गात अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन म्हणजे दिशाभूल आहे. मराठा समाजासाठी चारशे कोटीची स्वंतंत्र व्यवस्था करण्याची गरज आहे.

‘सारथी’ला सक्षम करण्याची गरज आहे. मराठा समाजाला चांगले पॅकेज देण्याची गरज असतानाही केवळ मलमपट्टी करण्याचे काम सुरु आहे. ओबीसींचे आरक्षण आम्हाला नको. फडणवीस यांनी दिलेले स्वतंत्र आरक्षण आम्हाला हवे. सगळ्यांना सामान न्याय मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे. न्यायालयीन लढाईत सरकारकडून निष्काळजीपणा झाल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

पत्रकार रायकर यांच्या कुटुंबियांना एक लाखाचा धनादेश

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य म्हणून प्रवीण दरेकर यांनी स्वतःकडून एक लाखाचा धनादेश दिला. रायकर यांच्या मृत्यूप्रकरणी दुःख व्यक्त करून भविष्यात त्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.