Pune News : ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या उद्यापासून

एमपीसी न्यूज – कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना उद्यापासून (दि. 21) सुरुवात होणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली ही लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित करण्यात येणार आहे.

बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, येत्या सोमवारपासून (दि.21) तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू करण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी काही स्वयंसेवकही पुढे आले आहेत.

शनिवारपासूनच आम्ही स्वयंसेवकांची भरती करायला सुरुवात केली आहे. साधारणपणे 150 ते 200 स्वयंसेवकांना ही लस देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पुण्यातीलच केईएम रुग्णालय आणि भारती विद्यापीठ रुग्णालयात घेण्यात आल्या होत्या. आता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या ‘ससून’मध्ये सुरू होत आहेत.

इंग्लंडमधील स्वयंसेवकांना कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान त्रास जाणवल्याने अस्ट्राझिंका या कंपनीने चाचण्या थांबविल्या होत्या. अस्ट्राझिका ही सिरम इन्स्टिट्यूटची युरोपातील भागीदार कंपनी आहे. भारतात औषध प्रशासनाने चाचण्यांना स्थगिती दिली होती. परंतु, इंग्लंडमध्ये स्वयंसेवकांची शहानिशा झाल्यानंतर चाचण्यांवरील बंदी उठवण्यात आली. त्यामुळे भारतातही 15 सप्टेंबरला मानवी चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.