Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेशिस्त पुणेकरांवर आयुक्त उगरणार कारवाईचा हंटर

पुण्यातही मुंबईच्या धर्तीवर नागरिकांसाठी आचारसंहीता लागू केली जाणार आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गडद झाले असताना अद्यापही काही नागरिक विनाकारण सरासपणे गर्दी करीत आहेत. या बेशिस्त पुणेकरांवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार कारवाईचा हंटर उगरणार असल्याचे संकेत त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिले.

पुण्यातील कोरोनाचे संकट आटोक्यात येत नसल्याने कठोर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुण्यातही मुंबईच्या धर्तीवर नागरिकांसाठी आचारसंहीता लागू केली जाणार आहे.

दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभे राहता येणार नाही. आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, किंवा रस्त्यावर फिरता येणार नाही, कुठल्याही कारणास्तव मास्कचा वापर टाळता येणार नाही.

पुणे महापालिकेकडून याबाबत उद्या आदेश काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 26 हजार 532 रुग्ण झाले आहेत. त्यामध्ये 1 लाख 6 हजार 197 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या कोरोनामुळे 2 हजार 963 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

शहरात सध्या 17 हजार 372 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे शहरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तर, पुणे महापालिकेतर्फे बुधवारीच क्षेत्रीय स्तरावर कारवाई करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.