Pune News : मी आत्ता लगेच नाही तर निवृत्तीनंतर कोल्हापूरला जाणार : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : विनोदी शैलीत गमतीने चंद्रकांत पाटील यांनी काल ‘अटल गौरव पुरस्कार’ कार्यक्रमात ‘मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे, माझ्या विरोधकांनी हे लक्षात घ्यावे, असे वक्तव्य केले होते. मात्र, त्याचे राजकीय पडसाद उमटल्यानंतर ‘यू टर्न’ घेत सारवासारव करत, मी आत्ता लगेच नाही तर निवृत्तीनंतर कोल्हापूरला जाणार असल्याचे स्पष्टीकरण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. ‘एक म्हणतोय मी पुन्हा येईन, दुसरा म्हणतोय मी पुन्हा जाईन. पण तुम्हाला कोणी बोलावले होते,’ अशी विचारणा करत देवेंद्र फडणवीस आणि पाटील दोघांना जोरदार टोला लगावला.

त्यानंतर चार तासांनी चंद्रकांत पाटील यांनी आपण लगेच कोल्हापूरला जाणार नसल्याचे सांगत आपले मिशन अद्याप पूर्ण व्हायचे आहे, असे सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महात्मा सोसायटीमधील घरी पत्रकार परिषद घेत त्यांनी हा खुलासा केला. चंद्रकांतदादांच्या या खुलाशानंतर ते पुढील काही काळ तरी पुण्यातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तुम्ही पुढील निवडणूक कोथरूड मतदारसंघातून लढविणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, राजकारणात पुढच्या गोष्टी लगेच ठरविल्या जात नाही. उद्या भूकंप होईल, आणखी काही अडचण येईल. त्यामुळे त्याविषयी आता भाष्य करणे योग्य नाही.

मला येथे केवळ कोथरूड मतदारसंघासाठी पाठविलेले नाही. वेगळे मिशन माझ्यापुढे आहे. मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. मी कोल्हापूरमध्ये राहिलो काय किंवा नागपूरमध्ये राहिलो काय त्याने फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी वादंगावर पडदा टाकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.