Pune News: मागण्या मान्य न झाल्यास 1 नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल- विनायक मेटे

एमपीसी न्यूज – मराठा समाजाच्या 25 मागण्या राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत मान्य न केल्यास एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष पसरला आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात आज विचारमंथन बैठक पार पडली. या बैठकीत एकूण पंचवीस ठराव पारित करण्यात आले.

पुण्यात पार पडलेल्या विचारमंथन बैठकीचे आमंत्रण खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनाही देण्यात आले होते. परंतु बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत. याविषयी विचारले असता विनायक मेटे म्हणाले, उदयनराजेंनी मला या बैठकीला येण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु ते का आले नाही ते माहिती नाही. परंतु ते लवकरच मराठा आरक्षण प्रश्नावर साताऱ्यात बैठक आयोजित करणार असल्याचेही मेटे यांनी सांगितले.

हे सरकार शरद पवारांचा शब्द खाली पडू देत नाही, त्यामुळे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्‍न निकाली लागत नाही, तोपर्यंत एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती आम्ही शरद पवार यांच्याकडे करत आहोत, असेही विनायक मेटे यांनी यावेळी सांगितले.

आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा स्थगित न केल्यास 9 ऑक्टोबर रोजी मुंबई राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.