Pune News : थकित मिळकतकर न भरल्यास मिळकती होणार सील !

एमपीसी न्यूज : मिळकतकराच्या थकबाकीवरील व्याजात 80 टक्के सवलत दिली तरीही थकबाकी न भरणाऱ्यांवर महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. या योजनेतर्गंत नोव्हेंबरअखेर थकबाकीची रक्कम न भरणाऱ्यांच्या मिळकती सील करण्यासोबतच दंडासह कर वसूली केली जाणार आहे. दरम्यान, 50 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकती ‘सील’ करण्यात येत आहेत.

गेल्या काही वर्षांतील थकबाकी वसूल होण्यासाठी मिळकतकराच्या विशेषतः थकबाकीवरील दंडाच्या रकमेत सवलत जाहीर केली. त्यानुसार 2 ऑक्‍टोबरपासून लागू झालेल्या अभय योजनेतून 50 लाखांची थकबाकी असलेल्यांना त्यांच्या कराच्या दंडाच्या रकमेत 80 टक्के सवलत आहे.

त्यानुसार पहिल्या 33 दिवसांत 136 कोटी 62 लाखांचा कर जमा झाला. या योजनेतून किमान 400 कोटींच्या वसुलीची आशा आहे. दरम्यान, शहरात 10 लाख 64 हजार एवढ्या मिळकती असून 3 हजार कोटी कराची थकबाकी आहे. अभय योजनेतून 400 ते 500 कोटी अपेक्षित वसुली आहे.

याबाबत मिळकतकर विभाग प्रमुख विलास कानडे म्हणाले, मिळकतधारकांना विशेषत: थकबाकीदारांना अभय योजनेतून सवलत दिली जात आहे. तरीही, ती भरत नसलेल्यांना नोटिसा देऊन मिळकती ‘सील’ करण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.