Pune News: पुणेकरांची लूट थांबवा, कचऱ्यासाठी बेकायदेशीर शुल्क वसुली सुरु- आबा बागूल

जर कोणी नागरिक या बेकायदा आकारणी विरोधात कोर्टात गेल्यास व्याजासह नागरिकांना पैसे परत दयावे लागतील व त्याच्यावर आयपीसी सेक्शन द्वारे फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

एमपीसी न्यूज – पुणे शहरामध्ये नागरिक ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून वेगवेगळा पिशव्यांमध्ये ठेवतात. तो कचरा उचलण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने सार्वजनिक संस्था नेमल्या आहेत. या संस्था त्याबदल्यात झोपडपट्टीमधील प्रत्येक घरास 50 रुपये दरमहा व इतर भागातील घरास 70 रुपये दरमहा शुल्क नागरिकांकडून आकारात असून ही शुल्क आकारणी बेकायदेशीर असल्याचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.

पुणे महानगरपालिका पुणेकरांकडून मिळकत करामध्ये एआरव्हीच्या 25 टक्के सफाईकर आकारात असून हा कर घेण्या व्यतिरिक्त आपण नागरिकांवर कचऱ्यासाठी अतिरिक्त कर लादत आहोत. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

पुणे महानगरपालिकेत कमीत कमी 10 ते 12 लाख प्रॉपर्टी असेसमेंट झालेल्या असून त्यांच्याकडून प्रत्येकी 50 व 70 रुपये शुल्क घेतले जातात त्याची एकूण अंदाजे 100 कोटी रुपये नागरिकांकडून बेकायदेशीरपणे घेण्यात येतात.

याची कोणतीही लेखी स्वरूपात पावती दिली जात नसल्याने महानगरपालिकेकडे याची कोणतीही नोंद नाही. ही जनतेची दिशाभूल आणि लूट आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. कायद्याने एकाच कामासाठी दोनदा कर आकारणे हे बेकायदेशीर आहे.

नागरिक सफाई कर भरत असताना त्यांच्याकडून पुन्हा पैसे घेणे बेकायदेशीर असल्याने नागरिकांकडून पैसे घेऊ नये. हे त्वरित थांबण्याचे आदेश द्यावेत असे आबा बागूल म्हणाले.

नवीन कर प्रणाली राज्य सरकार सुरु करू शकते. परंतु, मुख्यसभा देखील नागरिकांवर अशाप्रकारे कर आकारू शकत नाही. महाराष्ट्र म्युनसिपल अ‍ॅक्टमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. असे शुल्क आकारणे हे बेकायदेशीर असल्याने वर्गीकरण केलेला कचरा गोळा केल्याच्या बदल्यात दिलेल्या शुल्काची पावती देखील दिली जात नाही.

जर एखादा नागरिक या बेकायदा आकारणी विरोधात कोर्टात गेल्यास व्याजासह नागरिकांना पैसे परत दयावे लागतील व त्याच्यावर आयपीसी सेक्शन द्वारे फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याची सर्व जबाबदारी आयुक्तांची राहील हे बेकायदेशीर होणारे काम त्वरित थांबवण्याची मागणी आयुक्तांना दिलेल्या पत्रात आबा बागूल यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.