Pune News: अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने 25 लाखांचे अर्थसहाय्य द्या- महापौर

अधिकारी व कर्मचारी हे कोरोना विषाणू संसर्गग्रस्त रूग्णांसाठी उपचारात्मक कामकाज व अशा रूग्णांशी प्रत्यक्ष संबंध येवून दिवंगत झाल्यास त्यांना एक कोटींचे सुरक्षा कवच पुरविण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज- मुख्य सभा मंजुरी देईल या भरवशावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे अधिकारी व कर्मचारी दिवंगत झालेले आहेत, त्यांच्या वारसांना प्रत्येकी रक्कम २५ लाखांचे अर्थसहाय्य तातडीने देण्यात यावे, अशी विनंती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना केली आहे. त्यासंबंधी सर्व पक्ष नेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

पुणे शहरामध्ये उद्‍भवलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापलिकेच्या विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्या करण्यात आलेल्या आहेत. ही जबाबदारी पार पाडत असताना महापालिका अधिकारी व कर्मचारी अग्रभागी राहून कार्यरत आहेत. त्यांचा कोरोनाग्रस्त रूग्णांशी जवळचा संपर्क येत आहे.

अधिकारी व कर्मचारी हे कोरोना विषाणू संसर्गग्रस्त रूग्णांसाठी उपचारात्मक कामकाज व अशा रूग्णांशी प्रत्यक्ष संबंध येवून दिवंगत झाल्यास त्यांना एक कोटींचे सुरक्षा कवच पुरविण्यात आले आहे. यापैकी आरोग्य सेवकांसाठी रू 50 लाख केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहेत व महानगरपालिकेकडून 50 लाख किंवा एका वारसास पुणे महानगरपालिकेमध्ये नियुक्ती व रू 25 लाख अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेस स्थायी समिती मार्फत मुख्य सभेची मान्यता घेणेकामी तसा प्रस्ताव स्थायी समितीने शिफारस करून जुलै 2020 च्या मुख्य सभेच्या कार्यपत्रिकेवर दाखल आहे. तर, हे सत्ताधाऱ्यांना उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत कार्यरत मनपा अधिकारी-कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यास केंद्र सरकार 50 लाख मृत सेवकांच्या कुटूंबास देणार ही घोषणा हवेत गेल्याने मंगळवारी महापौरांनी मुख्य सभा मान्यता देईल, या भरवशावर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सेवकांच्या कुटुंबास 25 लाख रुपये देण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले.

त्यावर आम्ही सहमती दिली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सेवकांच्या वारसांना तातडीने नोकरी द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहेच. पण आजच्या निवेदनानंतर प्रत्यक्षात मनपा सेवकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.