Pune News : पुणे महानगरपालिकेच्या 100 खाटांच्या कोविड रुग्णालयाला तात्काळ वीजजोडणी

एमपीसी न्यूज – मार्केट यार्डमधील ईएसआयसी रुग्णालयात पुणे महानगरपालिकेने सुरु केलेल्या 100 खाटांच्या स्वतंत्र कोविड रुग्णालयाला महावितरणकडून 80 किलोवॅट क्षमतेची नवीन वीजजोडणी तात्काळ कार्यान्वित करण्यात आली. महावितरण व महानगरपालिकेच्या संयुक्त सहकार्याने या कोविड रुग्णालयाचा स्वतंत्र वीजपुरवठा गुरुवारी (दि. 29) दुपारी 3 वाजता सुरु झाला आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी कोविड रुग्णालय व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहे. त्याप्रमाणे या स्वतंत्र कोविड रुग्णालयाला महावितरणने तात्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध करून दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, मार्केटयार्डमधील ईएसआयसी रुग्णालयामध्ये 100 खाटांचे स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरु करण्याची कार्यवाही पुणे महानगरपालिकेकडून सुरु करण्यात आली होती. यामध्ये ऑक्सिजनच्या 40 खाटांचा समावेश आहे. या रुग्णालयाच्या वीजपुरवठ्यासाठी 80 किलोवॅट क्षमतेची नवीन वीजजोडणी आवश्यक होती. महानगरपालिकेकडून नवीन वीजजोडणीचा अर्ज आल्यानंतर महावितरणकडून मंजुरीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून कोटेशन देण्यात आले. त्यानंतर पुणे महानगरपालिका व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

सोबतच दोन्ही संस्थांच्या संयुक्त सहकार्याने आवश्यक पायाभूत वीजयंत्रणेची उभारणी पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी कोविड रुग्णालयाला स्वतंत्र नवीन वीजजोडणीद्वारे वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.