Pune News: आज गणरायाचे विसर्जन, तरीही अमोनिया कार्बोनेट पावडर उपलब्ध नाही

फिरत्या हौदांची व्यवस्था महापालिका करणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते. हे नियोजन सुद्धा फसले आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना महापालिकेतर्फे गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला पुणेकरांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. आज (दि.1) गणरायाचे विसर्जन होणार आहे. मात्र, अमोनिया कार्बोनेट पावडर उपलब्ध नाही. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी ही पावडर मुंबई येथून येत असल्याचे सांगितले. पण, त्याठिकाणी सुद्धा ही पावडर उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त मूर्तीदान करावे, असे उत्तर विरोधी पक्षनेत्यांना दिले आहे. दीड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनापासून आता शेवटच्या दिवशीही महापालिकेतर्फे काहीही नियोजन करण्यात आले नाही, असा आरोप विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. 

फिरत्या हौदांची व्यवस्था महापालिका करणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते. हे नियोजन सुद्धा फसले आहे. स्थायी समिती मार्फत ही पावडर खरेदी करण्याची परवानगी घेतली होती. मात्र, पुणेकरांना गणरायाचे विसर्जन करण्यासाठी उपलब्ध का करून देण्यात आली नाही, असा सवालही दीपाली धुमाळ यांनी यावेळी उपस्थित केला.

गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी आवश्यक अमोनिया कार्बोनेट पावडर वितरण करण्यात आले नाही. फिरत्या हौदांचा मार्ग ठरवला, पण वेळापत्रक देण्यात आलेले नाही. पुणे महापालिकेतर्फे घरीच विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक अमोनिया कार्बोनेट पावडर उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले होते.

पण, तसे काहीही झाले नाही. गणेश विसर्जन करण्याचे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे पुणेकरांची गैरसोय होत आहे. नगरसेवकांना  गणेश भक्तांचे वारंवार फोन येत आहेत. मात्र, ही पावडर काही उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे दीड दिवसाच्या गणपती प्रमाणेच शेवटच्या दिवशीही विसर्जन करण्यासाठी भक्तांची गर्दी होण्याची भीतीही दीपाली धुमाळ यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.