_MPC_DIR_MPU_III

Pune News : पुणेकरांचे हौदातच गणेश विसर्जन, पालिकेने धडा घ्यावा : आबा बागुल

हौदांवरील गर्दी पाहता बहुसंख्य पुणेकरांनीही महापालिकेच्या हौदांचा पर्याय स्वीकारल्याचेच दिसून आले.

एमपीसी न्यूज – यंदा घराघरातच गणपती विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेने केले. परंतु, हौदातच गणपती विसर्जन करण्याकडे पुणेकरांचा कल राहिला. यातून महापालिकेने धडा घ्यावा, असा मौलिक सल्ला काँग्रेस पक्षाचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी दिला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

याबाबत बागुल यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. नदीत केल्या जाणाऱ्या मूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून हौदातील विसर्जनाचा पर्याय पुणेकरांकडून स्वीकारण्यात आला होता. महापालिकेने 15 क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीत मिळून 50  हौद  बांधले आहेत आणि बहुसंख्य पुणेकर या हौदांमध्ये गणपती विसर्जन करतात.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गर्दी टाळण्यासाठी हौदात तसेच नदीवरही विसर्जन करण्याची परवानगी न देण्याचा निर्णय महापालिका पदाधिकाऱ्यांनी घेतला. पुणेकरांनी घरोघरीच  गणेश विसर्जन करावे आणि सार्वजनिक मंडळांनी मंडपातच तात्पुरते हौद बांधून त्यात गणपतीचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात अनुभव वेगळाच आला. बहुसंख्य मंडळांनी पालिकेच्या हौदांमध्ये गणपती विसर्जन केले. हौदांवरील गर्दी पाहता बहुसंख्य पुणेकरांनीही महापालिकेच्या हौदांचा पर्याय स्वीकारल्याचेच दिसून आले.

घरोघरच्या गणपती विसर्जनासाठी पालिकेने अमोनियम बाय कार्बोनेट या पावडरचा पर्याय ठेवला होता. पण, ती पावडरही पुणेकरांनी वापरलीच नाही. पावडर खरेदीवर महापालिकेचा बराच खर्च झाला. यातील खूपसा खर्च वाया गेला. गणेश विसर्जनासाठी भाविक हौदांचाच पर्याय स्वीकारतात. यातून धडा घेऊन पुढील काळात महापालिकेने नेमके निर्णय घ्यावेत, असे आबा बागुल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सध्या बांधलेल्या हौदांमधील गणेश विसर्जनानंतरची व्यवस्था तातडीने आणि सुनियोजित पद्धतीने व्हावी, असे आवाहनही बागुल यांनी पालिका प्रशासनाला केले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.