Pune News: यंदा विसर्जन हौदाची सोय नाही, गणेशमूर्तींचे विसर्जन घरीच करा- महापौर मोहोळ

Pune News: Immersion tank is not available this year, immerse Ganesh idols at home says Mayor Murlidhar Mohol एका गणेशमूर्तीसोबत किमान चार भाविक सहभागी झाले तरी ही संख्या वीस लाखांपर्यंत जाऊ शकते.

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशोत्सव साजरा करताना सर्व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जनदेखील नागरिकांनी घरच्या घरी करावे’, असे आवाहन करत ‘घरगुती विसर्जनासाठी सोडियम बाय कार्बोनेट संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून सार्वजनिक घाट आणि विसर्जन हौदाची सुविधा मनपाकडून केली जाणार नाही’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

कोरोनाशी लढा देताना गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला असून याबाबत महापालिका, पोलीस आणि मंडळांचे एकमत झालेले आहे.

दरवर्षी जवळपास पाच लाख गणेश मूर्तींचे विसर्जन हौदात होत असते. एका गणेशमूर्तीसोबत किमान चार भाविक सहभागी झाले तरी ही संख्या वीस लाखांपर्यंत जाऊ शकते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही संख्याही लक्षात घेता महापालिकेने विसर्जन घाट आणि हौदाची व्यवस्था न करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘संवेदनशील आणि समाजभान असणाऱ्या माझ्या पुणेकरांना आवाहन आहे, की यंदा घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरातच करण्यात यावे, शिवाय घरगुती गणेशमूर्तींची उंची 2 फुटांपर्यंत असावी. गणेशोत्सव विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी निर्माल्य आणि मूर्ती अवशेष मनपाकडून घेऊन जाण्याची व्यवस्था केली जाणार आहे’.

‘गणेशमूर्तींची खरेदी मंडळांनी आणि नागरिकांनी शक्यतो ऑनलाइन पद्धतीने करावी. कारण यावर्षी गणेशमूर्ती विक्री स्टॉलला मनपा रस्ता, पदपथावर परवानगी दिली जाणार नाही. गणेशमूर्ती विक्री परवानगी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मनपा शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर दिली जाईल.

अशा परवानगी मनपाच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून देण्याचे नियोजन केले जात आहे. उत्सव कालावधीत रस्ता आणि पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अधिकृत परवानगी मिळणार नाही. अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसायास पूर्णपणे प्रतिबंध केला जाईल’, असेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.

उत्सव काळात येथे करा तक्रार…

http://complaint.punecorporation.org
टोल फ्री नंबर- 1800 103 0222,
सर्व महापालिका सहा. आयुक्त कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक
PMC Care Whatsapp NO- 9689900002
मुख्य कार्यालय संपर्क क्र. : 020-25501392
[email protected]
[email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.