Pune News : “एक देश एक रेशन कार्ड” योजनेची अंमलबजावणी सुरु

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या “एक देश एक रेशनकार्ड” योजनेंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणिकरण करून लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा 7 लाख शिधापत्रिकांवर जिल्ह्यांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करुन धान्याची उचल केली जाते. एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 94.56 लाख शिधापत्रिकाधारकांनी जिल्ह्यांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे अन्नधान्याचा लाभ घेतला आहे.

‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची सुरुवात 2018 मध्ये इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम (आयएम- पीडीएस) म्हणून करण्यात आली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये 2 क्लस्टर्सच्या स्वरुपात महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश व तेलंगणा या चार राज्यांमध्ये एक देश ‘एक रेशन कार्ड’ची अंमलबजावणी प्रायोगिक स्वरूपात करण्यात आली आहे.

या दोन क्लस्टर्स पैकी एका क्लस्टर मध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्य होते. माहे जानेवारी, 2020 पासून ‘एक देश एक रेशन कार्ड’ ची अंमलबजावणी 12 राज्यात (महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, झारखंड, हरियाणा, त्रिपुरा व गोवा) करण्यात आली.

डिसेंबर 2020 पासून एकूण 32 राज्य/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना सुरु झाली आहे. या राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील कोणताही एनएफएसए कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करून कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. या योजनेतंर्गत दि. 15 एप्रिल, 2021 पर्यंत महाराष्ट्रातील 6320 शिधापत्रिकांवरील लाभार्थ्यांनी बाहेरील राज्यांमध्ये धान्याची उचल केली आहे. तसेच इतर राज्यातील 3521 शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रात धान्याची उचल केली आहे.

राज्यातील रास्तभाव दुकानांतून स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी इ. स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतरणाच्या ठिकाणी कोणत्याही रास्तभाव दुकानांत त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य प्राप्त करून घेण्याची सुविधा पोर्टेबिलिटीद्वारे ई-पॉस उपकरणांवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणिकरणाद्वारे धान्य वितरीत करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.