Pune News : खासगी हॉस्पिटलमधील दीड लाखांपेक्षा कमी बिलांची देखील तपासणी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – राज्यशासनाच्या आदेशानुसार, महापालिकेकडून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलकडून दीड लाखांपेक्षा अधिक बील केल्यास महापालिकेकडून अशा बिलांची तपासणी केली जाते. मात्र, अनेक रुग्णालये काही तकलादू उपचार करुन दीड लाखांच्या आत बिल देत असल्याचे दाखवून रूग्णांकडून त्यातही आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे दूड लाखांच्या आतील तक्रार आलेल्या बिलांचीही तपासणी करावी, अशी मागणी नगरसेविका मंजूषा नागपूरे यांनी केली आहे.

याबाबत, नागरिकांकडून मोठया प्रमाणात तक्रारी येत असल्याने पालिकेने सर्व हॉस्पिटलला बिलांच्या आकारणीचे दर दर्शनिय भागात लावावे अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

शहरात अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. हॉस्पिटलच्या खाटा कमी असल्याने अनेकदा या हॉस्पिटलचे बेड ताब्यात घेतले जात नसले तरी, त्या ठिकाणी रुग्णांवर तातडीची बाब म्हणून हे हॉस्पिटल उपचार करतात मात्र, तीन ते चार दिवसांसाठी त्यांच्याकडून एक ते दीड लाखांची बिले वसूल केली जातात, त्यासाठी दिली जाणारी औषधे तसेच इतर सुविधांचा खर्च चढ्या दराने लावून अनेकदा रुग्णांची स्थिती गंभीर होत असल्याचे सांगत पैसे भरून रुग्णाला इतर दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगतात.

त्यामुळे रुग्णाचा जीव महत्त्वाचा असल्याने नातेवाईक पैसेही भरतात मात्र, नंतर त्यांना उपचाराच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे, अशा रूग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी बिलांच्या रकमेची दीड लाखांची अट तातडीनं काढून टाकण्यात यावी, अशी मागणी नागपूरे यांनी केली आहे. तसेच अडचणीच्या काळात नागरिकांची लूट करणारी ही हॉस्पिटल पालिकेने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी रुग्णांना शासनाच्या नियमानुसार बेड उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.