Pune News : पुण्यात कामावरून काढून टाकल्याचा रागातून मालकिणीला पेट्रोल टाकून पेटवले, दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – टेलरिंग चा दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्याचा रागातून त्याने मालकिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळून टाकण्याचा प्रकार घडला. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरी येथे हा प्रकार घडला. या घटनेत मालकिणी सह कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाला जॉनी (वय 32) आणि मिलिंद नाथसागर (वय 35) या दोघांचा मृत्यू झाला. तर या दोघांना वाचवण्यासाठी गेलेला प्रशांत कुमार नावाचा तरुणही भाजल्याने जखमी झाला आहे. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वडगाव शेरी परिसरात बाला जॉनी यांचे टेलरिंगचे दुकान आहे. मागील दोन वर्षापासून मिलिंद हा त्या ठिकाणी काम करत होता. काही दिवसांपूर्वीच बाला यांनी मिलिंद त्याला कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग मिलिंद याच्या डोक्यात होता. त्याच रागातून त्याने सोमवारी रात्रीच्या सुमारास बाला हिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. या घटनेत मिलिंद आणि बाला दोघेही जखमी झाले होते. स्थानिक नागरिकांनी दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान गंभीर जखमी असलेल्या मिलिंद याचा पहाटे पाच वाजता तर बाला हिचा सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुर्देवी मृत्यू झाला.

 

मयत बाला की मूळची ओरिसा येथील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला आहे. दहा वर्षीय मुलासोबत ती या ठिकाणी राहत होती. वडगाव शेरी परिसरात मागील दहा वर्षांपासून ती टेलरिंगचा व्यवसाय करत होती. तर मिलिंद हा मुळचा परभणीचा असून दोन वर्षापासून तो बाला हिच्या दुकानात काम करत होता. चंदननगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी मयत आरोपी मिलिंद नाथसागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.