Pune News : भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेचे शुक्रवारी उदघाटन

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या बहुचर्चित भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन येत्या 1 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेच्या मुख्य सभागृहात दुपारी 4 वाजता हा उदघाटन समारंभ होईल.

या योजनेतून 2.64 टिएमसी पाणी पुणे शहराला मिळणार आहे. त्याचा सुमारे 12 लाख नागरिकांना फायदा होणार आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहरातील खासदार, आमदार अणि सर्व राजकीय पक्षाचे शहराध्यक्ष व नगरसेवक यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, ‘रिपाइं’च्या गटनेत्या सुनिता वाडेकर आदी उपस्थित होते.

शहराच्या पूर्वभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने 2013 मध्ये भामा-आसखेड योजनेचे काम सुरू केले होते. तब्बल आठ वर्षांनंतर विविध अडथळे पूर्ण करत अखेर हे काम पूर्ण झाले.

भामा-आसखेड धरणातून 42 किलोमीटरवरून 418 कोटी रुपयांचा खर्च करून ही योजना पूर्ण केली आहे.

जिल्हयातील विविध ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि कोरोनाची साथ यामुळे या योजनेच्या उदघाटनाचा कार्यकम पालिकेच्या सभागृहात घेण्यात येणार आहे, असेही महापौर  मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.