Pune News: पुणे शहरात स्वॅब टेस्ट व रॅपिड अँटिजेन टेस्टिंग संख्या वाढवा – दीपाली धुमाळ 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली मागणी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात स्वॅब टेस्ट व रॅपिड अँटिजेन टेस्टिंग संख्या वाढवा, इंडस्ट्रीजमध्ये कामगारांसाठी कोरोना हॉस्पिटल उभारावे, अशा अनेक मागण्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्या.

पुण्यातील विधान भवन येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषयक बैठक आयोजित करण्यात आली होती.  सीसीसी सेंटर अथवा नायडू  हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रूग्णाला आयसीयु, व्हेंटीलेटर बेड्स व ऑक्सिजन बेडस  मनपाने उपलब्ध करून घ्यावे. पुणे शहरात स्वॅब टेस्ट  व रॅपीड ॲटिजेन टेस्टिंग संख्या वाढविणे गरजेचे आहे, अशी मागणी धुमाळ यांनी केली.

पुणे शहरात मनपाने स्वतःची स्वॅब टेस्ट लॅब ची निर्मिती करावी. कारण आज स्वॅब टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट तीन ते चार दिवसांनी येतो, तोपर्यंत जर एखादा रूग्ण पॉझिटिव्ह आढळला तर तो रूग्ण रिपोर्ट येईपर्यंत सार्वजनिक ठिकाणी अनेकांना संपर्कात येतो. याकरिता पुणे मनपा ची स्वत:ची लॅब असावी, अशी सूचना त्यांनी केली.

राज्य सरकारचा माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाची जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. जम्बो हॉस्पिटल, बाणेरमधील डेडिकेअर हॉस्पिटल, बालेवाडी हॉस्पिटल व मनपाच्या इतर सीसीसी सेंटरमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी मनपाने जास्तीत जास्त नागरिकांना व रूग्णांना सुविधा दिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अजूनही खाजगी दवाखान्यात बेड्स उपलब्ध होत नाहीत. बेड्स उपलब्ध झालेच तर भरमसाठ बील आकारले जात असल्याची तक्रार धुमाळ यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.