Pune News : शाळेमार्फत विद्यार्थ्यांना कोविड मार्गदर्शक सूचनांची माहिती द्या – अजित पवार

एमपीसी न्यूज – चार ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. कोविड संसर्गाचा धोका अजूनही पूर्णपणे टळला नसून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोविड मार्गदर्शक सूचना आणि त्या अनुरूप वर्तणुकीची माहिती देण्यात यावी, याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शाळांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार गिरीष बापट, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जि.प. अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, विद्यार्थ्यांना मास्क घालणे, शारीरिक अंतराचे पालन करणे आणि कोविड संसर्गापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाच्या आवश्यक खबरदारी बाबत सातत्याने माहिती देण्यात यावी. वर्गातील बैठक व्यवस्थेतही शारीरिक अंतराचे पालन होईल याकडे लक्ष द्यावे. येत्या काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. नागरिकांकडूनदेखील मास्कचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून 30 सप्टेंबरपासून सलग 75 तास लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत सर्व लसीकरण केंद्रे कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागातदेखील अशाच पद्धतीने 75 तासांची ‍विशेष लसीकरण मोहीम घेण्यात यावी. जिल्ह्यातील 13 तालुक्यापैकी 6 तालुक्यात 75 तास आणि उर्वरीत 7 तालुक्यात 75 तासात सलग लसीकरण घेण्यात यावे. लोकप्रतिनिधींनीदेखील लसीकरण मोहिमेत उत्साहाने सहभाग घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले.

जिल्ह्यात कमी होणारी कोविड बाधितांची संख्या लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागात इतर आजारांच्या रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार करण्याची सुविधा करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. ग्रामीण भागात एक रुग्णालय स्वतंत्र कोविड बाधितांसाठी आणि दुसरे रुग्णालय इतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयोगात आणावे. एकच रुग्णालय असलेल्या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. त्यासाठी आवश्यक असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. परिचारिकांची नियुक्ती करतांना गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही पवार यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.