Pune News : नगरसेवक धनराज घोगरे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत केलेल्या मानहानीकारक वागणुकीची चौकशी करण्याची सूचना

0

एमपीसी न्यूज – पुणे मनपा आरोग्य अधिकाऱ्यांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा ताण पडत आहे, असे असतानाही पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉक्टर भारती यांच्या दालनांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी संतप्तपणाने बराच वादंग केला. त्याचवेळी ते डॉ. वैशाली जाधव यांच्या अंगावर धावून गेले. त्याचा परिणाम म्हणजे अशा मानहानीकारक वर्तनामुळे, अपमानामुळे डॉ. जाधव भानवाविवश झाल्या.

याबाबत डॉ. जाधव यांनी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे सदरील घटनेची माहिती दिली. यात एका बाजूला हॉस्पिटलमधील लसीकरण, कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा बोजा आरोग्य यंत्रणेवर आलेला आहे. घोगरे यांच्या वेगळ्या काही मागण्या असतील किंवा एखादे काम झाले नसेल तर कशा प्रकाराने बोलायचे याची आचारसंहिता, शिस्त, नियमावली, माणुसकी पाळणे आवश्यक होते पण घोगरे यांच्या वर्तनामुळे कायद्याला हरताळ फासला गेलेला आहे, असे मत ना. डॉ. गोऱ्हे व्यक्त केले आहे.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री विक्रम कुमार आणि पुण्यामधले सर्व लोकप्रतिनिधींना या सर्वांची जबाबदारी आहे की, सुरक्षित आणि निर्भय वातावरणामध्ये महिला कर्मचारी, महिला डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी यांना काम करता आले पाहिजे. या दृष्टिकोनातून घोगरे यांच्या कडून वर्तन झाले त्याबद्दल ना. डॉ. गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे व चौकशी समिती नेमण्याची सूचना मनपा आयुक्त यांना केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसेच डॉ. जाधव यांची व आरोग्य कर्मचाऱ्यांची घोगरे यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असे ना. डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे. याबद्दलच्या चौकशी समितीचा अहवाल नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याचे निर्देश देखील दिले आहेत. जेणेकरून घोगरे यांच्या वर्तनाच्या संदर्भात राज्य शासन कारवाई करायची याबद्दल विचार करू शकेल असे देखील डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर पुणे महापालिकेतील सगळ्या नगरसेवकांनी डॉ. जाधव यांच्या प्रकरणात बघ्याची भूमिका न घेता आणि घोगरे यांचे समर्थन न करता आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, राजेश टोपे या सर्वांकडे यासंदर्भातील माहिती व निवेदन ना. डॉ. गोऱ्हे यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment