Pune News: मोठे फुटपाथ, शौचालयांना रंगरंगोटी करणे म्हणजेच स्मार्ट सिटी का ? आबा बागूल यांचा सवाल

स्मार्टची संकल्पना अशी होती की, शहरावर त्याचा प्रभाव पडेल आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवाला, आरोग्याला व इतर कोणत्याही गोष्टीला धोका नसेल, हा खरा स्मार्टनेस पाहिजे.

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीच्या मानांकनात न अडकता पुणे शहर कसे स्मार्ट करता येईल याकडे लक्ष द्या, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी स्मार्ट सिटीच्या सीईओ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गेल्या काही वर्षांत स्मार्ट सिटीचा कारभार बघता पुणेकरांचा या योजनेवरील विश्वास उडालेला आहे. स्मार्ट म्हणजे काय हेच पुणेकरांना समजण्यास तयार नाही. शहरात मोठे फुटपाथ तयार करणे, झाडे लावणे, रस्ते बनवणे, शौचालयांना रंगरंगोटी करणे म्हणजेच स्मार्ट शहर करणे की काय? असा समज आता नागरिकांचा होऊ लागला आहे. ही कामे तर महानगरपालिकेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सभासद आपल्या भागात करत आहेत. मग स्मार्ट सिटी म्हणून कोणती विशेष कामे स्मार्ट सिटीने केली आहेत? असा सवालही बागूल यांनी उपस्थित केला आहे.

स्मार्टची संकल्पना अशी होती की, शहरावर त्याचा प्रभाव पडेल आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवाला, आरोग्याला व इतर कोणत्याही गोष्टीला धोका नसेल, हा खरा स्मार्टनेस पाहिजे. शहरामध्ये वाहतुकीचा आराखडा करणे, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे व नागरिकांचा त्याकडे कल वाढवणे म्हणजे स्मार्टनेस.

_MPC_DIR_MPU_II

सर्व इ गव्हर्नन्स आणणे त्याचे मार्गदर्शन करणे म्हणजे स्मार्टनेस, पर्यावरणाचा समतोल राखणे म्हणजे स्मार्टनेस, 900 हेक्टर बीडीपी झोनवर कसे वृक्षारोपण करणे, बीडीपीचे कसे संरक्षण व संवर्धन करता येईल म्हणजे स्मार्टनेस, पाण्याचा पुनर्वापर करणे म्हणजे स्मार्टनेस, महानगरपालिकेचा शिक्षणाचा दर्जा खालावत असताना दर्जेदार शिक्षण देणे म्हणजे स्मार्टनेस, शहरातील कचऱ्यासाठी उपाय योजना करणे म्हणजे स्मार्टनेस.

अशा उपाययोजना स्मार्ट शहर करत असताना माझ्या व पुणेकरांच्या मनात कल्पना होत्या. परंतु, सर्व आशा फोल ठरल्या. अशाप्रकारे स्मार्ट सिटीने काम केल्यास मानांकनासाठी आपण जी धावपळ करतोय. ती करावी लागणार नाही व मानांकनामध्ये आपले शहर कायमचे एक नंबरला राहिल.

इतर 99 शहरे आपला आदर्श घेऊन कामे करतील यासाठी आपण शहराच्या शाश्वत विकासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे. शहरासाठी महत्वाचे असलेल्या कामांना प्राधान्य देऊन शहर कसे स्मार्ट करता येईल, याकडे लक्ष द्यावे, असेही बागूल यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.