Pune News : समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद यांच्यासह विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ या देखील ‘इस्टेट एजंट’ आहेत का?

प्रशांत जगताप यांना बिडकर यांचे उत्तर....

एमपीसी न्यूज – महापालिकेने भाडेतत्वावर दिलेले फ्लॅट संबधित भाडेकरु यांना विकत देण्याचा ठराव शहर सुधारणा समिती तसेच स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मान्य करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता देणारे या समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद यांच्यासह विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ या देखील ‘इस्टेट एजंट’ आहेत का? हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीर करावे, असे आव्हान सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिले आहे.

शहराध्यक्ष पदाची नव्याने जबाबदारी मिळाल्याने काही तरी खळबळजनक करावे, या हेतूने सध्या प्रशांत जगताप हे मनाला वाटेल तशी व्यक्तव्य करत आहेत. पालिकेतील प्रत्येक गोष्टीत त्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याने अवघ्या एका महिन्यांमध्येच त्यांच्याच पक्षाचे सभासद त्यांच्या या कारभारामुळे त्रस्त झालेले आहेत. राष्ट्रवादीचे सभासद त्यांना किंमत देत नसल्यानेच पालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या प्रत्येक विकासकामांबद्दल जगताप यांना प्रश्न निर्माण होत असून त्यामुळे ते सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांबद्दल बेताल वक्तव्ये करत आहेत.

पालिकेच्या इमारतींमध्ये वर्षानुवर्ष भाड्याने राहणाऱ्या नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने संबंधित भाडेकरूंच्या नावावर ही घरे करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. एकही मोकळी सदनिका विक्री केली जाणार नाही. प्रशासनाने ठेवलेला हा प्रस्ताव नागरिकांच्या हिताचा असल्यामुळेच शहर सुधारणा समितीसह स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला एक मताने मंजुरी देण्यात आली आहे. जगताप यांचा त्यांच्याच पक्षाच्या सभासदांवर विश्वास दिसत नसल्यानेच ते अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करत असल्याचे बिडकर यांनी सांगितले.

या दोन्ही समितीमध्ये सभासद असलेल्या माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, नंदा लोणकर, बंडू गायकवाड यांच्यासह विरोधी पक्षनेत्या धुमाळ यांना या प्रस्तावाची माहिती होती. यापैकी एकाही सभासदाने समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला विरोध दर्शविला नाही. दोन्ही समित्यांमध्ये हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. असे असताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप हे सत्ताधारी पदाधिकारी पालिकेच्या जागा विकत असून इस्टेट एजंट झाले असल्याचे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देणारे राष्ट्रवादीचे सभासद देखील इस्टेट एजंट आहेत का? अशी विचारणा सभागृह नेते बिडकर यांनी केली आहे.

दोन्ही समित्यांमध्ये हा प्रस्ताव एकमताने मान्य झाला आहे. त्यावेळी राष्ट्रवादी झोपली होती का? राष्ट्रवादी शहरासाठी काय करणार हे अध्यक्षांनी सांगावे. पण राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष यांना केवळ पालिका आणि तेथील टेंडर मध्येच रस अधिक आहे.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका

कावीळ झालेल्या व्यक्तीला सर्व पिवळे दिसते तशीच काही स्थिती प्रशांत जगताप यांची झालेली आहे. शहराध्यक्ष असतानाही त्यांना केवळ पालिकेत रस वाटत असल्याची टीका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.