Pune News : पुण्यात घडवले जातेय छत्रपती शिवाजी महाराजांचे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे शिल्प

एमपीसी न्यूज – भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील क्रांती चौकात बसवले जाणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांच्या पुणे येथील चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ मध्ये हे शिल्प घडवण्याचे काम सुरु असून येत्या डिसेंबरपर्यंत शिल्पाचे काम पूर्ण होणार आहे.

अश्वारूढ असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे शिल्प 21 फुटांचे असून चौथऱ्यापासून शिल्पाची एकूण उंची 52 फूट असणार आहे. औरंगाबाद येथील क्रांती चौकात पुलावरून जाताना हे शिल्प सहजरित्या दृष्टीस पडेल एवढे भव्य व आकर्षक आहे. महाराजांचे हावभाव, भरजरी पोशाख, दागिने आणि एका हातात लगाम व दुसऱ्या हातात तलवार तसेच अश्वावरील झूल, खोगीर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे शिल्प निर्माण करण्यात येत आहे.

साधारण सहा महिन्यापासून 15-20 कामगार दीपक थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिल्प साकारत आहेत. प्रथम मातीकाम करून नंतर धातुरूपात हे शिल्प तयार होणार आहे. शिल्पाचे सर्व काम पुण्यातच होणार असून शिल्प तयार झाल्यानंतर ते पुण्यावरून औरंगाबाद येथे नेण्यात येणार आहे.

याआधीही दीपक थोपटे यांनी अनेक प्रकारची शिल्प तयार केलेली आहेत. यापैकी अकलूज येथील भुईकोट किल्ल्यातील शिवसृष्टी, जुन्नर येथील राजमाता जिजाऊ व बाळ शिवबांचे शिल्प, श्रीशैलम येथील शिवसृष्टी, चिंचवड येथील चाफेकर चौकातील चाफेकर बंधूंचे शिल्प, जगतगुरु संत तुकाराम महाराज गाथा मंदिर, देहू येथील शिल्पकला, Aqumagica Theme Park, Adlabs Entertainment Pvt Ltd Khopoli अशी अनेक मौल्यवान व भव्य शिल्पकला साकारलेली आहे.

या कलेसाठी दीपक थोपटे यांना जहांगीर आर्ट गॅलरी 2013, Ambala Cantt Certificate 1990, महाकौशल कला प्रदर्शन रायपूर 1992, आर्ट सोसायटी मुंबई, राष्ट्रीय कला मेळा, दिल्ली-1998, बॉम्बे आर्ट सोसायटी- 19997-98, राज्य कला स्पर्धा-2000 अशी नानाविध पारितोषिके व प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आलेले आहे. नुकताच दुर्गवारीच्या टीमने या शिल्पाकृतिचा आढावा घेतला.

video link :

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.