Pune News : पुणेकरांची योगसेवा करणे हे माझे भाग्यच : बाबा रामदेव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन योगशिबिराला सुरुवात; पुणे महानगरपालिका आणि पतंजली योग समितीचा उपक्रम

एमपीसी न्यूज – ‘कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्ण, नातेवाईक यांना मानसिक सकारात्मकतेची आवश्यकता असून ही मानसिक ताकद योगसाधनेने सहज मिळते. मनातील भीती, कोरोनाच्या उपचारांनंतर होणारे औषधांचे परिणाम आणि मानसिक तणाव ही आताची सर्वात मोठी आव्हाने आहेत. यावर मात करण्यासाठी नैसर्गिक उपाय आणि योगासने हा उत्तम पर्याय आहे. पतंजली योग समितीला या कोरोना संकटकाळात पुणेकरांची योगसेवा करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्यच आहे’, असे प्रतिपादन योगगुरु बाबा रामदेव यांनी केले.

कोरोना कालावधीत सर्वांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी पुणे महानगरपालिका आणि योगऋषी स्वामी रामदेवजी प्रणित पतंजली योग समिती पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नाने होम क्वारंटाईन, बरे झालेले कोरोनाबाधित आणि सर्वच पुणेकरांसाठी योग प्राणायाम आणि आयुर्वेदिक व घरगुती औषधांचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षणाचे उद्घाटन बाबा रामदेव यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

‘गुगल मीट’ आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या शिबिरास सुरुवात झाली असून दररोज सकाळी 7 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 6 या वेळेत योगशिबिर असणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 ते 7.30 या वेळेत 25 योग आणि आयुर्वेद तज्ज्ञ फोनद्वारे नागरिकांच्या शंकांचे समाधान करणार आहेत. हे शिबिर  http://meet.google.com/ctq-awcu-xar  या गुगल मीट लिंकवर तर पुणे महापालिकेच्या  https://www.facebook.com/PMCPune  या फेसबुक पेजवर उपलब्ध असणार आहे. उद्घाटनप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, यांच्यासह पदाधिकारी नगरसेवक आणि योगसमिती प्रतिनिधी महापौर कार्यालयातून उपस्थित होते.

बाबा रामदेव पुढे बोलताना म्हणाले, ‘पतंजलीमार्फत जवळपास दहा कोटी लोकांना योग शिकवला तर आहेच शिवाय औषधेही पुरवली आहेत. कोरोना काळात लोकांमध्ये खूप भिती आहे. लोक कोरोनाच्याभीतीने प्राण गमवत आहेत. औषधांचा होणारा अधिकचा मारा हाणीकारक आहे. लोकांना मानसिक त्रास असून तणावामुळे पुरेशी झोप नाही. या सर्वांमध्ये योगामुळे लोकांना नैसर्गिक ताकद जास्त प्रमाणात मिळू शकते. स्वास्थ्य चांगले आणि उत्तम होऊ शकते’

महापौर मोहोळ म्हणाले, ‘आज पुण्यात कठीण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांना मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी जी काही योगसाधना करण्याची गरज आहे आणि त्या योगसाधनचे सर्वांच्या जीवनात खूप मोठे योगदान आहे. या अभियानामार्फत सर्व पुणेकरांना एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. आज कोरोनाची दुसरी लाट गंभीर स्वरुपाची आहे. पुण्यात 80 टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. या योग शिबिरामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी फायदा होणार आहे. लोकांमधील भीती कमी होण्यास आणि त्यांचे मनोबल चांगले ठेवण्यास मदत होणार आहे’.

महापौर मोहोळ यांच्या कामाचे बाबा रामदेव यांच्याकडून कौतुक !
‘महापौर मोहोळ आपण खूप चांगले काम करत आहात. आपण खूप विनयशील आहात. या महामारीला मुक्त करण्यासाठी आपल्याला जी काही मदत लागेल, ती मदत पतंजलीमार्फत करण्याची तयारी आहे’, असेही बाबा रामदेव म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.