Pune News : शिक्षण क्षेत्रात नवीन पर्याय निर्माण करणे आवश्यक : दिलीप वळसे-पाटील

एमपीसीन्यूज : प्रत्येक देशाच्या नवनिर्मितीमध्ये शिक्षण क्षेत्राचे महत्त्वाचे योगदान असून विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवत शिक्षणाची सर्वांगीण प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. तसेच कोरोनामुळे ऑनलाईन स्वरूपामध्ये सर्वत्र ज्ञानदान होत असताना भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन पर्याय निर्माण करणे गरजेचे असून त्याबाबतीत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे गौरोद्गार महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी काढले.

राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि संस्थेच्या महाविद्यालय व शाळा यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित अनंत व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी झुम ॲप, फेसबुक लाइव्ह व यु – ट्युब लाइव्हद्वारे सुमारे 800 पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मणराव पवार, सहसचिव आत्माराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲड. संदीप कदम यांनी अनंत व्याख्यानमालेचे उद्देश व स्वरूप स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आयोजित विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच कोविडमुळे पारंपरिक शिक्षण पद्धती बदललेली असताना शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत स्वतःला अद्ययावत ठेवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे नमूद करत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची आतापर्यंतची देदीप्यमान वाटचाल व अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेत असलेल्या भरारीबद्दल थोडक्यात माहिती दिली.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी विद्यार्थ्यांची काळजी करणारे नेतृत्व असे अजितदादांचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये झालेल्या मोबाईल, व्हिडिओ कॉन्फरन्स अशा विविध अविष्काराबद्दल थोडक्यात माहिती देत शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून विद्यार्थ्याला अधिक शोधक व सर्जनशील घडवणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आघाडीवर आहे असे नमूद करत भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये इतिहास घडवणाऱ्या परम महासंगणकाची संकल्पना थोडक्यात स्पष्ट केली.
संस्थेच्या हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी वर्ष स्मृतिचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांची विशेष उपस्थिती होती.

सूत्रसंचालन डॉ. माया माईनकर यांनी केले. आभार लक्ष्मण पवार यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. अशोक भोसले, प्राचार्या डॉ. रागिणी पाटील, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, प्राचार्य डॉ. पंडित शेळके, प्राचार्या डॉ. सुषमा भोसले, प्राचार्या डॅा. शर्मीला चौधरी, प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, प्राचार्य डॅा. व्ही.एम.शिंदे तसेच सिताराम अभंग, किरण देशपांडे, संतोष पठारे यांनी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.