Pune News : कोव्हिड योद्ध्यांप्रती ऋण व्यक्त करणं ही जबाबदारी – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – कोरोना काळात लाखो कोव्हिड योद्ध्यांनी ग्राऊंडवर उतरुन काम केलं. त्यांच्या कामामुळेच आपल्या देशात एकही भूकबळी झाला नाही. त्यांच्या कामाबद्दल ऋण व्यक्त करणं ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोथरूडमधील प्रभाग क्रमांक 13 मध्ये स्थानिक नगरसेवक जयंत भावे यांच्या पुढाकाराने कोरोना योद्ध्यांना समर्पित सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

पाटील म्हणाले की,  “कोरोना काळात लाखो कोव्हिड योद्ध्यांनी ग्राऊंडवर उतरुन काम केलं. अनेकांनी महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहून काम केलं. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान करणं, ऋण व्यक्त करण्याची आवश्यकता आहे.”

ते पुढे म्हणाले की, “कोरोनाच्या नऊ महिन्यांच्या काळात 130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आर्थिक कोंडीनंतरही एकही भूकबळी झाला नाही. ज्या वेळी आवश्यक होतं, त्यावेळी समाजातील अनेकांनी भरभरुन मदत केली. या काळात कोव्हिड योद्ध्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, पत्रकार, बॅंकिंग क्षेत्रातील कर्मचारी या सर्वांमुळे समाजाचं अर्थचक्र सुरू राहिलं. त्या सर्वांप्रती ऋण व्यक्त करतो.”

यावेळी पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ करत उपक्रमात सहभागी सर्व सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या. तसेच काही कोरोना योद्ध्यांचा सरकार देखील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.