Pune News : सरकार पडेल, सरकार पडेल म्हणण्यातच चंद्रकांत पाटलांची चार वर्षे सरतील- जयंत पाटील

एमपीसीन्यूज : ज्या दिवशी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं, त्यादिवशी चंद्रकांत पाटील हे सरकार दोन महिन्यात पडेल, असे म्हणाले होते. परंतु सरकारने एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला आणि पुढची चार वर्षे हे सरकार पूर्ण करेल. सरकार पडेल, सरकार पडेल असे सांगण्यातच चंद्रकांत पाटलांची चार वर्षे सरतील, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना टोला लावला.

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड यांचा उमेदवारी अर्ज जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज, गुरुवारी सादर करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, हे सरकार स्थिर आहे याची चंद्रकांत पाटलांनाही चांगली कल्पना आहे. सरकारने आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला आणि पुढची चार वर्षे सरकार आरामात पूर्ण करेल.

पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या वतीने पुणे पदवीधर मतदारसंघात लाड यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे काम केले आहे.

जी. डी. लाड यांच्या विचारांचा वारसा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होईल. आमच्या मित्रपक्षातील काहींनी जरी अर्ज दाखल केले असले तरी योग्य वेळी अर्ज मागे घेऊन तेही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील.

अर्णब गोस्वामी जामीन प्रकरणी प्रश्न विचारले असता पाटील म्हणाले, विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या तिकीट वाटपामध्ये व्यस्त असल्यामुळे मला गोस्वामी काय बोलले हे ऐकले नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.