Pandurang Raikar : पत्रकार रायकर यांचा मृत्यू धक्कादायक, कुटुंबियांना भाजपातर्फे पाच लाखांची मदत देणार -चंद्रकांत पाटील

कोरोनाच्या साथीबाबत पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी इत्यादी कोरोना वॉरिअर्सप्रमाणेच पत्रकारांचेही काम महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने पत्रकारांना राज्य सरकारकडून मदत होत नाही.

एमपीसी न्यूज – पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे झालेला मृत्यू धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबियांना भारतीय जनता पार्टीच्या आपदा कोषातर्फे पाच लाख रुपये मदत देण्यात येईल, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज, बुधवारी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाच्या साथीबाबत पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी इत्यादी कोरोना वॉरिअर्सप्रमाणेच पत्रकारांचेही काम महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने पत्रकारांना राज्य सरकारकडून मदत होत नाही.

सरकारने पत्रकारांनाही 50 लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, तसेच भाजपातर्फे पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत पाटील यांनी जाहीर केली.

टीव्ही 9  वाहिनीचे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर वेळेवर रुग्णालयात दाखल करण्याबाबत परवड झाली. त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी खूप प्रयत्न करूनही योग्य रुग्णवाहिका वेळेत मिळाली नाही, ही बाब मन सुन्न करणारी आहे.

त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुण्यातील अनेक पत्रकारांनी प्रयत्न केले, पण यश आले नाही. अशी हतबलता पुण्यात अनेक नागरिकांना अनुभवावी लागत आहे, हे दुर्दैव आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने पुरेशी यंत्रणा उभारली नाही, हेच यातून स्पष्ट होते.

कोरोनाची चाचणी किंवा लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणे याबाबतीत राज्यामध्ये सर्व अधिकार हे राज्य सरकारकडे एकवटले आहेत. सरकारी यंत्रणेने पूर्ण एकजुटीने प्रयत्न करून रुग्णांवर वेळीच उपचार होतील, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

पुण्यामध्ये कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत अशा वाढत्या तक्रारी येत आहेत. जम्बो हॉस्पिटल उभारले तरी तेथे पुरेसे मनुष्यबळ असणे आणि प्रभावी उपचार होणेही गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.