Pune News : पत्रकारांनी काळ्या फिती लावून काम करावे- पुणे श्रमिक पत्रकार संघाचे आवाहन

पुणे श्रमिक पत्रकार संघाने रायकर यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या ढिसाळ राजकीय आणि प्रशासकीय घटकांचा निषेध केला आहे.

एमपीसीन्यूज : पत्रकार पांडुरंग रायकर यांचा बुधवारी (दि. 2) दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला जे जबाबदार आहेत त्या ढिसाळ राजकीय आणि प्रशासकीय घटकांचा ‘पुणे श्रमिक पत्रकार संघाने निषेध नोंदवला आहे. रायकर यांना न्याय मिळेपर्यंत संघातर्फे टप्याटप्याने आंदोलन करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात आजपासून पुढील आठ दिवस पुण्यातील सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून काम करावे आणि आपला निषेध व्यक्त करावा, असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे.

‘टीव्ही 9’ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे काल बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने यंत्रणेचा गलथान कारभार व निष्काळजीपणा समोर आला.

या घटनेबाबत संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर रायकर यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणीही जोरकसपणे करण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाने रायकर यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या ढिसाळ राजकीय आणि प्रशासकीय घटकांचा निषेध केला आहे.

तसेच रायकर यांच्या मृत्यूबाबत तात्काळ चौकशी करावी आणि मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांवर ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आली आहे.

याशिवाय पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोना योद्धयांसाठी जाहीर केलेलया 50 लाखांच्या विमा कवचाचा लाभ मिळावा आणि ती मदत त्यांचा कुटुंबीयांना देण्यात यावी. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, जेणेकरून असे मृत्यु रोखले जातील, अशा मागण्या संघाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी; अन्यथा आठ दिवसांनंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यासाठी प्रसंगी पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने करतील, असा इशारा संघाच्या वतीने राज्यसरकारला आणि इतर संबंधीत यंत्रणांना देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.