Pune News : विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी काकडे, बापट गटाला पसंती

या सर्व उमेदवारांनी आज अर्ज दाखल केला.

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपतर्फे राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे, खासदार गिरीश बापट यांच्या गटातील नगरसेवकांचा विचार करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या या समित्यांच्या निवडणुकीसाठी आज भाजपच्यावतीने या दोन्ही गटातील नगरसेवकांना संधी देण्यात आली.

शहर सुधारणा समिती अध्यक्ष पदासाठी माजी उपमहापौर आणि नगरसेवक प्रसन्न जगताप, उपाध्यक्ष पदासाठी शीतल सावंत, क्रीडा समिती अध्यक्ष पदासाठी विरसेन जगताप, उपाध्यक्ष पदासाठी छाया मारणे, महिला बालकल्याण समिती अध्यक्ष पदासाठी माधुरी सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष पदासाठी वृषाली चौधरी, विधी समिती अध्यक्ष पदासाठी मनीषा लडकत, उपाध्यक्ष पदासाठी मनीषा कदम यांना संधी देण्यात आली आहे.

या सर्व उमेदवारांनी आज अर्ज दाखल केला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर, नगरसेवक महेश वाबळे उपस्थित होते.

या चारही विषय समित्यांमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे सर्व अध्यक्ष आणि उपाध्यक्ष भाजपचे होणार हे स्पष्ट आहे. या विषय समित्यांवर निवड होण्यासाठी भाजपच्या अनेक नगरसेवकांनी प्रयत्न केले. त्यामध्ये बऱ्याच जणांना यश आले. तर, काही जणांना अपयश आले.

मागील 4 वर्षांपासून काकडे गटाला कोणतेही महत्वाचे पद देण्यात आलेले नाही. यावेळी या गटाचा विचार करण्यात आला आहे. 2017 ची महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी काकडे गटाचा मोठा लाभ झाला होता.

त्यामुळे 2022 च्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी काकडे गटाला सोबत ठेवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याची महापालिकेत कुजबुज सुरू आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी या विषय समित्यांची निवडणूक होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.