Pune News : बाणेर कचरा प्रकल्प, बीडीपी प्रकरणी कोथरूडचे आजी-माजी आमदार महापालिकेत !

एमपीसी न्यूज : बाणेर येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प, बीडीपी आरक्षणासह अन्य प्रलंबित प्रश्नांसंदर्भात कोथरूड विधानसभा मतदारसंघातीचे आजी माजी आमदार महापालिकेत आले. भाजपातील या अंतर्गत स्पर्धेमुळे राजकीय चर्चा रंगली होती.

कोथरूड विधानसभेचे विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी आज महापालिकेत दाखल झाले होते. चंद्रकांतदादा पाटील यांनी महापौर, सभागृह नेता आणि नगरसेवकांसोबत महापालिकेत आढावा बैठक घेतली. यामध्ये कोथरूडमधील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून मार्गी लावण्यासाठी गाठीभेटी घेतल्या. यावेळी नगरसेवकांच्या गराड्यात पाटील होते.

तर दुसरीकडे कोथरूड विधानसभेच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्थानिक नागरिकांसमवेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी सुमारे 400 घरांवरील बीडीपी आरक्षण उठविण्यासह कचरा प्रकल्पा संदर्भात राष्ट्रीय हरीत न्याय प्राधिकरणाने (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) दिलेल्या आदेशाविरोधात महापालिकेने अपील करू नये, अशी आग्रही मागणी मांडली.

तत्पुर्वी महापालिका भवनात असुनही विद्यमान आमदार चंद्रकांतदादांची भेट कुलकर्णी यांनी घेतली नाही.

गत विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वात सुरक्षित जागा म्हणून चंद्रकांतदादांनी मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून स्वत: निवडणूक लढविली व विजयी देखील झाले. त्यानंतर राजकीय पटलावरून ‘सेल्फ क्वारंटाईन’ झालेल्या मेधाताई पुन्हा एकदा फिल्डवर ॲक्टिव्ह झाल्यामुळे राजकीय चर्चा रंगली.

एकीकडे विद्यमान आमदार त्याच विषयांवर नगरसेवकांसमवेत महापालिकेत आले होते. त्याचवेळी माजी आमदार नागरिकांना घेऊन आल्यामुळे भाजपा अंतर्गत स्पर्धा तर सुरू झाली नाही ना अशी खमंग चर्चा रंगली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.