Pune News : ‘कृषी ऊर्जा पर्वाची’ फलश्रृती; 12 लाख शेतकरी थकबाकीमुक्तीच्या दिशेने

एमपीसी न्यूज – एक मार्च ते 14 एप्रिलपर्यंत राबविण्यात आलेल्या ‘कृषी ऊर्जा पर्वा’ला शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ऊर्जा विभागाच्या कृषी धोरणाला पसंती व प्रतिसाद देत सहभागी झालेल्या 12 लाख 15 हजार शेतकऱ्यांची वीजबिल थकबाकीमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली असून, प्रत्यक्षात 2 लाख 92 हजार शेतकऱ्यांचे कृषी वीजबिल संपूर्णपणे कोरे झाले आहे.

यासोबतच एकूण थकबाकीमध्ये तब्बल 66 टक्क्यांपर्यंत सवलत मिळवित शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसाठी 1184 कोटी रुपयांचा भरणा देखील केला आहे. राज्यातील 34 जिल्हे व ग्रामपंचायतींनी एकूण 66 टक्के हक्काचा 845 कोटी रुपयांचा निधी मिळविला आहे. दि. 1 एप्रिल 2018 पासून प्रलंबित 44 हजार 250 नवीन वीजजोडण्या आतापर्यंत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांसोबत 1181 मेगावॉट क्षमतेचे करार करण्यात आले आहेत. कृषी धोरणाला राज्यातील शेतकऱ्यांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आभार मानले आहे.

_MPC_DIR_MPU_II

महावितरणकडून दि. 1 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान ‘कृषी ऊर्जा पर्वा’चे आयोजन करण्यात आले होते. या पर्वामध्ये राज्यभरात ग्राहक मेळावे, ग्रामसभा, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, सायकल रॅली, थेट बांधावर शेतकरी संवाद, एक दिवस देश रक्षकांसाठी, पथनाट्ये, ग्राहक संपर्क अभियान, लघुचित्रफित, प्रसार माध्यमांद्वारे कार्यक्रम, आवाहन आदी विविध 6216 कार्यक्रम घेण्यात आले आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वात ‘कृषी ऊर्जा पर्वा’च्या आयोजनातून कृषिपंप वीज धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीला सुरवात झाली असून थकबाकीमुक्तीसह या धोरणातील विविध तरतुदींचा लाभ घेण्याची गावागावांमध्ये ओढ लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.