Pune News : पीएमपीएमएलच्या अटल योजनेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमीटेडच्या (पीएमपीएमएल) वतीने ‘अटल (अलाईनिंग ट्रान्सिस्ट ऑऩ ऑल लेन्स) बस सेवा’ योजनेचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरीच्या महापौर उषा ढोरे, पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पालिकेतील सभागृह नेता धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. दिपप्रज्ज्वलन आणि बसला हिरवा झेंडा दाखवून योजनेचे औपचारीक उद्घाटन करण्यात आले. सर्व प्रमुख पाहुण्यांनी प्रत्यक्ष बसमध्ये प्रवास देखील केला.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पुणेकर व पिंपरी चिंचवड वासियांसाठी ‘पाच किलोमीटरचा प्रवास पाच रुपयात’ हा उपक्रम अटल बससेवा योजनेच्या माध्यमातून पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 37 मार्गांवर राबविला जाणार आहे.

तसेच प्रत्येक बसस्थानकावर पाच मिनीटात बस सोडण्याचे नियोजन देखील केले जाणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण शहरातील सर्व मार्गांवर ही योजना लागू केली जाणार आहे.

नागरिकांनी दुचाकी व चारचाकी वापरण्याऐवजी बससेवा वापरावी. जेणेकरून इंधनाची व पैशांची बचत होईल, तसेच वाहतूककोंडी व प्रदुषण पतळी कमी होण्यास मदत होईल, असा या योजनेमागील उद्देश आहे.

त्यामुळे पुणेकर व पिंपरी चिंचवड नागरीकांकडून या योजनेला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.