Pune News : लीला पूनावाला फाऊंडेशनतर्फे 477 शालेय मुलींना शिष्यवत्ती प्रदान

एमपीसी न्यूज: आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या 477 शालेय मुलींना लीला पूनावाला फाऊंडेशनने शिष्यवृत्ती देऊन शैक्षणिक आधार दिला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून गावडेवाडी, कामशेत व पुणे शहरात चार दिवसांचा शिष्यवृत्ती प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळेस मुलींना शिष्यवृत्तीची प्रमाणपत्रे देण्यात आली व त्यांना व त्यांच्या पालकांना मिठाईचे बॉक्स देण्यात आले.
आज शिक्षणासाठी बऱ्याच मुली पुढे येऊन शिकत आहेत, याचा मला अभिमान वाटतो. पालकांनी मुलींना शिक्षणासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन मी करते. त्यांनी मुलींना सक्षम बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी विनंती सेको टूल्सच्या सुपर्णा रे यांनी यावेळी केली.
25 वर्षांतील आणि नंतरच्या अनेक प्रकल्पांमधील ‘टूमारो-टूगेदर’ हा शिष्यवृत्ती प्रकल्प मला मनापासून प्रिय आहे. लहान मुलींना सातव्या इयत्तेत शिकताना आणि त्यांना भविष्यातील स्वतंत्र महिलांच्या रुपात पाहणे खरोखरच आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे होणारे परिवर्तन अविश्वसनीय आहे. तसेच कोरोनामुळे विलंबित झालेली पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती लवकरच जाहीर केली जाईल, असे एलपीएफचे संस्थापक ट्रस्टी फिरोज पूनावाला यांनी सांगितले.