Pune News : पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत सकारात्मक विचार करू- राजेश टोपे यांचे आश्वासन

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री टोपे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

एमपीसीन्यूज : राज्यातील सर्वच पत्रकार कोरोना संदर्भात जनजागृती करून सर्व सामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहचविण्याचे काम करीत असतात. त्यामुळे पत्रकारांना कोरोना योध्दा या क्षेत्रात ग्राह्य धरण्याबाबत येत्या कॅबिनेटमध्ये सकारात्मक चर्चा करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा नुकताच कोरोनाने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री टोपे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

त्यावेळी मंत्री टोपे यांनी पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते.

कोरोनाच्या युद्धात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्याबरोबर पत्रकार ही मागे नाहीत. त्यामुळे त्यांना कोरोना योद्धा गृहीत धरून 50 लाखांचे विमा कवच जाहीर करावे, आणि तसा शासन आदेश निर्गमित करावा.

तसेच पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना तातडीने 50 लाखांची मदत द्यावी. त्याचबरोबर जे माध्यमकर्मी, पत्रकार कोरोना बाधित होतील त्यांच्यासाठी खाजगी रुग्णालयात तातडीने बेड उपलब्ध करून मोफत उपचार करावेत. त्याबाबतचे तातडीने शासन आदेश काढावेत, अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.