Pune News: पाळीव प्राण्यांसाठी लागणारा परवाना आता ऑनलाइन मिळणार

एमपीसी न्यूज: घरामध्ये पाळण्यात येणाऱ्या पाळीव प्राण्यांसाठी घ्यावा लागणारा परवाना आता ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होणार आहे या संदर्भातील काम पुणे महापालिकेकडून करण्यात येत असून पुढील एक महिन्यात ही प्रणाली सुरू होणार आहे.

महापालिका हद्दीत अंदाजे साडेतीन लाख भटकी आणि 80 ते एक लाखापर्यंत घरगुती पाळीव श्वान आहेत. यामध्ये समाविष्ट गावांमधील श्वानांचाही समावेश आहे. शहरातील पाळीव श्वानांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी परवाना घ्यावा लागतो. यासाठी श्वानाच्या मालकास त्याला रेबीज लस दिल्याचे प्रमाणपत्र, राहण्याच्या पत्याचा पुरावा, श्वानाचा फोटो, कर भरल्याची पावती, सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र आदी कागदपत्रे महापालिकेकडे सादर करावी लागतात.

तसेच स्वतःच्या जागेच्या हद्दीबाहेर, सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर श्वानाला मोकळे सोडणार नाही, सदर श्वानाने कुणाला दुखापत करू नये, यासाठी त्याच्या तोंडाला मुस्के घालणे, त्याला नैसर्गीक विधी करण्यासाठी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी घेवून जाणार नाही, असे प्रतिज्ञापत्र श्वानाच्या मालकाला लिहून द्यावे लागते. त्यानंतर महापालिका श्वान मालकास मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे परिशिष्ट 14. नियम क्र. 22 (अ)चे कलम 386 (1) नुसार सशुल्क परवाना आणि अटी व शर्तीचे कार्ड देते.

श्वानाच्या परवान्याची सर्व प्रक्रीया यापूर्वी क्षेत्रीय कार्यालयांकडून मॅन्यूअल पद्धतीने राबवली जात होती. श्वान परवाना प्रक्रीयेला लागणार्‍या वेळामुळे परवाना घेण्यास फारसे कोणी पुढे येत नाही. शहरात 80 हजार ते एक लाख पाळीव श्वानांची संख्या असताना गतवर्षात केवळ 2236 परवान्यांची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी श्वानांचे परवाने घ्यावेत, यासाठी आरोग्य विभागाने परवान्याची संपूर्ण प्रक्रीया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील दीड महिन्यात ही सुविधा पुणेकरांना उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.